Breaking News

सुमारे एक तास रस्ता रोको, पालिकेच्या कारभाराचे वाभाडेयादोगोपाळ पेठेत पाण्यासाठी नागरिक रस्त्यावर
सातारा/ प्रतिनिधी : गेली चार दिवस पाण्याचा नियमीत पुरवठा होत नसल्याने तसेच पालिकेला वारंवार कळवूनही दखल न घेतल्याने वैतागलेल्या यादोगोपाळ पेठेतील नागरिकांनी सोमवारी गोल मारुती परिसरात सुमारे अर्धा तास रस्ता रोको केला. यावेळी नागरिकांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले. दरम्यान, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी तातडीने दाखल होत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला.
यादोगोपाळ पेठेत पहाटे सव्वा पाच व सकाळी सव्वा सात वाजता पाणी सोडले जाते. मात्र गत चार दिवसापासून तुळजाभवानी कॉम्प्लेक्स, साई हेरिटेज, सुपनेकर पिछाडी, बोकील बोळ, साई प्रेस्टिज, रमाकांत टॉवर व गोलमारुती परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत पेठेतील नागरिकांनी वारंवार पालिकेला लेखी तक्रारही दाखल केल्या आहेत मात्र याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. अखेर सोमवारी सकाळी पेठेतील सुमारे 50-60 नागरिकांनी गोलमारुती परिसरात अर्धा तास रस्ता रोको केल्याने प्रशासनाची पळापळ झाली. मोठी वाहतूक कोंडी झाल्याने याठिकाणी पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी तातडीने धाव घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तातडीने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, यावेळी नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासारखी जीवनावश्यक बाब वेळेवर न देणार्‍या पालिकेचे चांगलेच वाभाडे काढले.
आंदोलनस्थळी स्थानिक नगरसेवक धनंजय जांभळे यांनी भेट दिली. नागरिकांच्या समस्या नेमक्या काय आहेत यावर चर्चा करत पालिकेने तातडीने याबाबत उपाययोजना न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.