Breaking News

राज्यात 1972 पेक्षा भीषण दुष्काळ शरद पवार यांचे निरीक्षण; सर्वंकष निर्णयाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

shatad pawar साठी इमेज परिणाम
मुंबई / प्रतिनिधीः सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात 1972 पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर शेतकर्‍यांनी मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून लक्ष घालावे आणि संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्याची वेळही पवार यांनी मागितली आहे. पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील टप्पा संपताच सोलापूर, सातारा, बीड, उस्मानाबाद, नगर या दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करत शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेताच्या बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच चारा छावण्यांतील शेतकर्‍यांच्या, मालकांच्या अडचणीही समजून घेतल्या. शेतकर्‍यांच्या समस्या, त्यांच्या अडचणी यावर कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात शेतकर्‍यांचे प्रश्‍न, मुद्दे, त्यांच्यासमोरील समस्या आणि दुष्काळावर काय उपाययोजना कराव्यात, याबाबतचे सविस्तर म्हणणे मांडले आहे. या समस्यांवर चर्चा करण्यासाठी पवार यांनी दुष्काळी भागातील काही प्रतिनिधींसह मुख्यमंत्र्याच्या भेटीची वेळही मागितली आहे.