Breaking News

स्टेट बँकेच्या एटिएम मधून 1 लाख लांबविले


कोपरगाव ता/प्रतिनिधी: कोपरगावच्या एसटी वाहतूक नियंत्रक सेवानिवृत्त किशोर जगन्नाथ हलवाई (रा. शिवाजी रोड, कोपरगाव) यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते आहे. या खात्यातील रक्कम 1 लाख 37 हजार रुपये परस्पर काढल्याने खळबळ उडाली आहे. दि.4 मे रोजी लग्न समारंभानिमित्त पुखाया (ता. अकबरपूर, कानपूर) येथे गेले असता हा प्रकार घडला. यासंदर्भात किशोर हलवाई यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया कोपरगाव शाखा अधिकार्‍यांकडे परस्पर काढलेली रक्कम मिळाली नाही म्हणून अर्ज केला आहे. तसेच याप्रकरणी नगर येथील सायबर सेलच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांशी भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

याबाबत हलवाई यांनी पत्रकारांना दिलेली अधिक माहिती अशी की, हलवाई यांचे कोपरगाव स्टेट बँकेत खाते आहे. ते एसटी खात्यात प्रथम वाहक म्हणून व नंतर वाहतूक नियंत्रक म्हणून पुणे आगारातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना रजेच्याफरकाची चार लाख 60 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर एसटी
महामंडळाकडून जमा करण्यात आली होती. हलवाई हे पुखाया (कानपूर) येथे एका लग्नसमारंभासाठी गेले होते. त्यांना ही रक्कम आपल्या खात्यावर जमा झाली किंवा नाही याची खातरजमाकरून किरकोळ खर्चासाठी दोन हजाररुपयांची रक्कम एटीएममधून काढायची होती. दि.3 मे रोजी पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून पुखाया येथून सकाळच्या सुमारास दोन हजार रुपये काढले. तसा एसएमएस पहाटे चार वाजता मिळाला. पैसे काढण्याचा प्रयत्न एटीएम कानपुर सेंट्रल तसेच रावतपूरमध्ये केलेला नाही किंवा माझ्या एटीएमचा कोड नंबरही कोणाला दिलेला नाही.

 मला बँकेचा अथवा कुठल्याही व्यक्तीचा मोबाइल आला नाही. मात्र, माझ्या खात्यावरून राम प्रसाद तिडके या व्यक्तीच्या नावाने 20 हजार रुपये काढले. नंतर गायत्री यादव यांच्या नावे 20 हजार रुपये काढले. पुन्हा राम प्रसाद तिडके याने 19 हजार रुपये काढले, असे एकूण 59 हजार रुपये परस्पर वरील व्यक्तींच्या नावे जमा करण्यात आली. तसेच 78 हजार रुपये रोख काढण्यात आले. असे मेसेज हलवाई यांच्या मोबाइलवर आले आहेत. एटीएममधून एका दिवसाला फक्त 20 हजार रुपये मिळू शकतात. मग एकाच दिवशी 59 हजार रुपये ट्रान्सफर करून व 78 हजार रुपये रोख रक्कम कशी काढण्यात आली, याची चौकशी होऊन माझे गेलेले
एक लाख 37 हजार रुपये मला परत माझ्या खात्यावर मिळावे, अशी मागणी हलवाई यांनी कोपरगाव पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याकडे केली आहे.