Breaking News

उत्तर प्रदेशातील सप-बसप युती तुटेल 23 मे पूर्वीचः योगी आदित्यनाथ

Related image
लखनऊः 23 मेला लोकसभेचा निकाल लागण्याआधीच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाची महाआघाडी तुटेल. मायावती-अखिलेश हे ‘आत्या-भाचे’ एकमेकांवर हल्ले करतील, असे भाकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. या वेळीही उत्तर प्रदेशात भाजपलाच सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे आता शेवटचे फक्त दोन दिवस उरले आहेत. या निवडणुकांमध्ये कर्नाटकपासून हिमाचल प्रदेशपर्यंत सर्वच राज्यांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी भाजपसाठी जोरदार प्रचार केला आहे; पण योगींच्या होम ग्राउंडवर मात्र त्यांचीच मठात ‘घरवापसी’ करू, त्यांना मुख्यमंत्रिपद सोडायला भाग पाडू, अशा घोषणा सप-बसपच्या नेत्यांनी दिल्या आहेत. राज्यातील भाजपची विजयी घोडदौड रोखण्यासाठी एकमेकांचे तोंडही न पाहणारे मायावती आणि मुलायमसिंह एकत्र आले आहेत.

सप-बसप युतीचा निवडणुकांवर काय परिणाम होईल, याबद्दल विचारले असता योगी म्हणाले, की सप-बसपची युती 23 मे चे निकाल लागण्याआधीच तुटेल. बुवा (मायावती) आणि बबुवा (अखिलेश यादव) त्याआधीच एकामेकांवर हल्ले करतील. रक्ताचे पाट वाहायलाही हे कमी करणार नाहीत. हिंसाचार होऊ नये, यासाठी मी आधीच पोलिसांना राज्यात कडेकोट बंदोबस्त करण्याची सूचना दिली आहे. उत्तर प्रदेशात मायावतीला यावर्षीदेखील एकही जागा मिळणार नाही, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. 2014 प्रमाणेच या वेळीही मायावतीला एकही जागा मिळणार नाही. मुलायमसिंह एकेकाळी राज्यात 37 जागा जिंकले आहेत; पण या वेळी त्या जागा कमी होतील. आझमगड, कन्नौज आणि बदायूंमध्ये ते पराभूत होतील.