Breaking News

पाकिस्तानकडून भारताच्या 43 मच्छीमारांना अटक


नवी दिल्ली : सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत पाकिस्तानने 43 भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. पाकिस्तानी नौदलाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मच्छीमारांसह 6 बोटीदेखील जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व मच्छिमारांना स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले आहेत. अशी माहिती मॅरीटाइम सिक्यॉरिटी एजेन्सीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या मच्छीमारांना न्यायिक दंडाधिकार्‍यांसमोर हजर केले जाणार आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. भारतीय मच्छीमारांना सागरी हद्द ओलांडल्यावरून यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानी नौदलाकडून अटक करण्यात आली आहे. या आधी अटक करण्यात आलेल्यांना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एप्रिल महिन्यात 4 टप्प्यांमध्ये 360 भारतीय मच्छीमारांना भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने कराचीतील लांधी आणि मालिर येथील तुरूंगातून 250 भारतीय मच्छीमारांची तीन टप्प्यांमध्ये सुटका केली होती. 2017 मध्ये श्रीलंकेच्या नौदलाने 10 भारतीय मच्छीमारांना कटचथिऊ येथे काही दिवसांपूर्वी अटक केली होती. संबंधित मच्छीमार तामिळनाडूमधील थानगचिमदाम येथील रहिवासी आहेत. रामनाथपुरम येथील लहान बेट असणार्‍या कटचथिऊजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडले. त्यांच्याकडील बोट सुद्धा जप्त केली होती. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगातील मच्छीमारांची सुटका करण्याचा सामंजस्य करार केला. त्यानुसार श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या अनेक भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली होती.