Breaking News

सांगलीत आढळला 800 वर्षापूर्वीचा यादवकालीन ’शिलालेख’


सांगली : इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा सांगली जिल्हयाच्या भूमीत पाहायला मिळतात. आणि अशाच एका इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्राध्यपक गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना बेडग येथे महादेव मंदीरात आढळून आला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवी सन 1222 मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून 800 वर्षांपूर्वीच्या या शिलालेखात मिरज आणि बेडग येथील व्यापार्‍यांनी शिवमंदिराला दिलेला हा दानलेख आहे.
तब्बल 800 वर्षांपूर्वीचा यादव कालीन एक शिलालेख सांगलीच्या बेडगमध्ये आढळला आहे. इतिहास संशोधकांच्या अभ्यासादरम्यान एका मंदिरात हा शिलालेखा सापडला. या लेखामुळे सांगली जिल्ह्यातील यादवकालीन इतिहासाचा अभ्यास केला जाणार आहे. शिवाय सांगली जिल्ह्यात 800 वर्षांपूर्वी देवगिरीच्या यादव राजांची सत्ता असल्याचा दावा संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी केला आहे. शिलालेखाबद्दल माहिती देताना इतिहासकार मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेली काही वर्षे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यास सुरू आहे. हा अभ्यास करताना सांगली, सातारा, कोल्हापूर या जिह्यात वेगवेगळ्या गावात वीरगळ, सतीशिळा यावरील लेखांबरोबरच शिलालेख आणि ताम्रपटांचाही अभ्यास मंडळाचे अभ्यासक प्राध्यपक गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर करत आहेत. या अभ्यासात त्यांना अनेक अप्रसिध्द लेख मिळून आले आहेत.

बेडग येथे त्यांना राजवाड्यालगत असणार्‍या महादेव मंदिरात एक शिलालेख आढळून आला. हा लेख भींतीमध्ये लावण्यात आला आहे. हा शिलालेख सुमारे 3 फुट उंचीचा असून, तो हळेकन्नड लिपीत आहे. सदरच्या शिलालेख दोन टफ्फ्यात असून, सध्या त्याच्या 28 ओळी वाचता येतात. शिलालेखाच्या वरील भागात मध्यभागी शिवलिंग असून, त्याच्या एका बाजूला सुर्यचंद्र, नंदी आणि दुसर्‍या बाजूला गाय कोरले आहेत. एक भक्त शिवलिंगाची पुजा करतानाही या शिलालेखावर दाखवण्यात आले आहे.

मिळालेल्या लेखात प्रारंभी देवगिरीचा यादव सम्राट दुसरा सिंघण याचा गौरव करणार्‍या ओळी आहेत. माळवा, गुर्जर या देशातील राजांचा पराभव करणारा, होयसळ आणि तेलगू देशात वादळ माजविणारा प्रतापचक्रवर्ती सिंघण राजा देवगिरी येथे काव्य विनोदात सुखनैवपणे राज्य करत असताना हा दान लेख दिले असल्याचे यामध्ये म्हटले आहे. हा दान लेख शके 1144 चित्रभानू संवत्सर, कार्तिक शुध्द प्रतिपदा यादिवशी म्हणजेच इसवी सन 1222 साली दिला आहे. या लेखात सिंघण देवाचा सेनापती विक्रमदेव याचा उल्लेख आला आहे. या लेखानुसार मिरज आणि बेडग येथील व्यापार्‍यांनी मंदिरासाठी दान दिले आहे. यामध्ये त्यावेळी प्रसिध्द असणार्‍या ‘वीरवणंज’ या व्यापार्‍यांच्या संघटनेचाही उल्लेख यामध्ये आला आहे.