Breaking News

मढेवडगावात लिंबाची बाग जळाली


कोळगाव/प्रतिनिधी : श्रीगोंदे तालुक्यातील मढेवडगाव येथे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आग लागून वामन सीताराम मांडे या अल्पभूधारक शेतकर्‍याची फळे लगडलेली लिमोणी ( लिंबाची) बाग जळाली. यात जवळपास लिंबाची सत्तर झाडे जळून खाक झाली. याशिवाय बागेच्या कडेला असलेले नारळ, चिक्कू, सीताफळ, पेरूची तसेच जांभळाची झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जमिनिवर असलेल्या ठिबक सिंचन पाईपलाईनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेजारी असलेला जनावरांचा सुमारे 1 एकर चारा (कडवळ) कापून ठेवला होता, तोही आगीत जळून भस्मसात झाला.

आधीच मढेवडगाव येथे पाण्याची टंचाई असल्याने वामन सीताराम मांडे यांनी थोडे-थोडे पाणी साठवून ठिबकद्वारे पाणी देऊन त्यांनी बाग जगविली होती. मांडे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे बागेचा सांभाळ केले होता. सध्या लिंबाला बाजारभावही चांगला आहे. त्यात आगीमुळे बागेचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात आकस्मिक जळीत झाल्याची नोंद करून पुढील तपास पोलिस हवालदार नवले हे करत आहेत.