Breaking News

पंतप्रधानपदावर पाणी सोडण्याची काँग्रेसची तयारी


नवी दिल्ली : केंद्रातून भाजपला हद्दपार करण्यासाठी काँग्रेसने नवी खेळी करत पंतप्रधानपदावर पाणी सोडण्याची तयारी दाखवली आहे. तसे स्पष्ट सूतोवाच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी  केले आहेत. स्वबळावर सत्ता न मिळाल्यास आघाडीसाठी प्रयत्न केले जातील, यासाठी पंतप्रधानपद सोडावे लागले, तरी हरकत नाही, असे आझाद म्हणाले.

काही झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला केंद्रात सत्ता स्थापण्यापासून रोखणे हे पक्षाचे एकमेव लक्ष असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, यावेळी बोलताना आझाद यांनी आम्ही आमची भूमिका जाहीर केली आहे. जर महाआघाडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला सहमती मिळत असेल, तर काँग्रेस नेतृत्व स्वीकारेल असे त्यांनी स्पष्ट केले. पुन्हा एनडीएचे सरकार केंद्रात स्थापन होऊ नये, हाच आमचा एकमात्र उद्देश असणार आहे, असे सांगत महाआघाडीत सर्वाच्या सहमतीनेच पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब केले जाईल, असे आझाद म्हणाले.

काँग्रेसला स्वबळावर सत्ता दुरापास्त दिसत असली, तरी मागच्या तुलनेत अधिक जागा मिळविण्याची आशा आहे. दुसरीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी स्वबळावर सत्ता शक्य नसल्याचे सूतोवाच केले होते. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येत्या 21 मे ला विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत निकालानंतर कोणती व्यूहरचना आखायची यावर खलबते केली जाणार आहेत.