Breaking News

माजी चेअरमनचा अटापिटा कारखान्यांच्या खुर्चीसाठीच


कार्वे / प्रतिनिधी : कृष्णा कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहोचण्याची घाई झालेल्या माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांचा सहकाराचा अभ्यास कच्चा आहे. सहकार कायद्यातील 97 व्या घटनादुरुस्तीनुसार कृष्णा कारखान्याचे विद्यमान संचालक मंडळ कार्य करीत असताना, विरोधक मात्र राजकीय हेतूने मुद्दे उपस्थित करून सभासदांची दिशाभूल करण्याची धडपड करत आहेत. या दोन्ही माजी चेअरमनचा हा अटापिटा निव्वळ कृष्णा कारखान्याच्या खुर्चीसाठी सुरू असल्याची टीका श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केली. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2019-20 गळीत हंगामाकरिता तोडणी वाहतूक करार शुभारंभ व सभासद मोफत साखर वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

व्यासपीठावर चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक गुणवंतराव पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, संजय पाटील, पांडुरंग होनमाने, दिलीपराव पाटील, कार्यकारी सूर्यकांत दळवी, बहेचे उपसरपंच मनोज पाटील, संजय गांधी निराधार योजनचे तालुकाध्यक्ष संजय पवार, कराड तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष एम. के. कापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सहकार कायद्यातील 97 व्या घटनादुरूस्तीनुसार कारखान्याकडून अक्रियाशील सभासदांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. यावरून विरोधकांनी आरोपांची राळ उडविली असताना त्यांना रोखठोक उत्तर देण्याचे काम डॉ. अतुल भोसले यांनी केले. सहकार कायद्यानुसार सभासदांनी संस्थेशी सातत्याने संपर्क ठेवला पाहिजे. मात्र अनेक सभासद कारखान्यास अनेक वर्षांपासून ऊसपुरवठा करत नाहीत. अशा सभासदांना कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीसा पाठविल्या असता, विरोधकांनी मात्र पत्रकार परिषद आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे सभासदांचा मताधिकार डावलला जात असल्याचा कांगावा सुरू केला आहे. कारखान्याच्या सत्तेपर्यंत पोहचण्याच्या उद्देशानेच हे दोन्ही माजी चेअरमन अटापिटा करत असल्याचा टोला लगावत, डॉ. भोसले यांनी सूज्ञ सभासद मात्र अशा प्रवृत्तींना थारा देणार नाहीत, असा विश्र्वास व्यक्त केला. यावेळी संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना मोफत साखरेचे वाटप करण्यात आले. तसेच तोडणी वाहतूक कराराचा प्रारंभ करण्यात आला. सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. धोंडिराम जाधव यांनी आभार मानले. 

साखर कारखान्यांना ऊसतोडणी वाहतूकीची थकबाकी मोठ्या प्रमाणात सोसावी लागत असल्याने आर्थिक फटका बसत असतो. पण कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या शेती विभागाने गेल्या 4 वर्षांत देदीप्यमान कामगिरी करत ऊसतोडणी वाहतूकीची थकबाकी शून्य ठेवली आहे. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसान टळण्यास मदत झाली असून, कारखान्याच्या शेती विभागाने राज्यात आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार ना. डॉ. अतुल भोसले यांनी काढले.