Breaking News

धरणाजवळ असूनही बुळे पठार येथे पाण्याची तीव्र टंचाई


राहुरी/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील मुळा धरणापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या बुळे पठार येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. या भागात एक दिवसाआड टँकर येत आहे. धरणाचे पाणी कैक किलोमीटर लांब नेण्यात आले. मात्र, या धरणापासून सात किलोमीटरवर असलेले तालुक्यातील बुळे पठार दुर्लक्षित झाले आहे. हे गाव उंच पठारावर असल्याने येथे पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत.
आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या बुळे पठार येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अल्प पावसामुळे या परिसरातील विहिरी व बोअर कोरडे पडले आहेत. दोनशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावाला एक टँकर पुरत नाही, त्यातूनच जनावरांचाही पाण्याचा प्रश्‍न भेडसावत आहे. 

टँकर आला तरी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा बुडवून पाण्यासाठी धावपळ करावी लागते. अवघे माणशी वीस लिटर पाणी मिळत असून त्यामध्ये एक दिवस काढावा लागत आहे. विशेष म्हणजे मुळा धरणाचे पाणी सत्तर किलोमीटरपेक्षा अधिक लांब नेण्यात आले. मात्र, या धरणापासून सात किलोमीटरवर असलेले तालुक्यातील बुळे पठार दुर्लक्षित झाले आहे. लोकसंख्या कमी व पाणी योजनेचा खर्च अधिक त्यामुळे पाण्याविना राहण्याची वेळ आली. आम्हाला एकवेळ जेवण नसले तरी चालेल मात्र पाणी खूपच आवश्यक असल्याचे येथील ग्रामस्थ मच्छिंद्र दुधवडे, गोरक्षनाथ जाधव, यशवंत बुळे, दगडू केदार यांनी सांगितले आहे.