Breaking News

मंदीत साथ दिल्याने शेतकऱ्यांनी केला व्यापाऱ्यांचा सत्कार


राहाता/प्रतिनिधी: चालू हंगामामध्ये द्राक्ष खरेदीसाठी बाहेरील व्यापारी न आल्याने चिंतेत असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे दोन हजार टन द्राक्षे योग्य दराने खरेदी करून स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. वेळेत मालाची काढणी आणि योग्य दर दिल्याने येथील शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांचा सत्कार केला.

दुष्काळाच्या झळा सोसत पाणीटंचाईचा सामना करून सांभाळलेल्या द्राक्ष बागांना यावर्षी मोठ्या प्रमाणात द्राक्षघड लगडलेली होती. परंतु यंदा बाजारपेठेत मंदी असल्याने बाहेरचे व्यापारी द्राक्षे खरेदीसाठी राहात्यात न आल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहीला होता. परंतु या परिस्थिमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी हा माल योग्य दारात खरेदी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला. यामुळे साकुरी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संजय उपाध्ये व संजय निरगुडे यांच्या कल्पनेतून स्थानिक खरेदीदार शफीक शेख, असिफ शेख, अन्सार शेख , गोरख निर्मळ, अमित रोहम, बाळासाहेब निरगुडे, सुभाष सदाफळ आदी व्यापाऱ्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप रोहोम. भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे आदींसह शेतकरी उपस्थित होते.