Breaking News

अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकाची होळी

अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या परिपत्रकाची होळी साठी इमेज परिणाम

अहमदनगर/प्रतिनिधी : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेबाबतचे दि.10 मे रोजी निर्गमीत केलेले परिपत्रक रद्द करण्याची मागणी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली. तर जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयासमोर या परिपत्रकाची होळी करुन निषेध नोंदवित राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी सुनील पंडित, अप्पासाहेब शिंदे, भाऊसाहेब कचरे, महेंद्र हिंगे, चंद्रकांत चौगुले, कल्याण ठोंबरे, बाळासाहेब वाकचौरे, भाऊसाहेब रोहोकले, बद्रीनाथ शिंदे, सुनील काकडे, सुनील दानवे, हरी भोंदे, सोपान काळे, रमाकांत दरेकर, तुषार शिंदे, सुनील भोर, संजय इंगे आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि.10 मे रोजी राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील कर्मचार्‍यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना दि.1 नोव्हेंबर 2005 पासून लागू केली आहे. शासनाच्या या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेमध्ये दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेले परंतु या तारखे नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचार्‍यांचा गांभीर्याने विचार करण्यात आलेला नसून, त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे समितीचे म्हणणे आहे. दि.1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे सर्व कर्मचारी हे नियमित वेतन श्रेणीमध्ये काम करत असताना त्यांना दि. 31 ऑक्टोबर 2005 शासननिर्णय कसा लागू होऊ शकतो? याबाबत प्रश्‍न समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णया विरोधात समितीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. दि.10 मे 2018 च्या परिपत्रकानुसार भविष्य निर्वाह निधीच्या कपात बंद करण्याची घाई न करता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी अवधी मिळावा, तूर्तास भविष्य निर्वाह निधी कपात बंदी करण्याची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना सुरू करण्याची घाई न करण्याची मागणी समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.