Breaking News

शेतकर्‍यांनी गट शेतीकडे वळावे : मनोहर साळुंखे


शेंद्रे / प्रतिनिधी : शेती व्यवसायात प्रगती करण्यासाठी शेतकर्‍यांनी संघटित होऊन गट शेतीला प्राधान्य द्यावे. पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकर्‍यांनी एकत्रित येऊन शेती करणे खूप गरजेचे आहे. संघटितपणामुळेच शेती क्षेत्रात भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यास मदत होईल. तसेच शासन राबवत असलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांंचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कृषी भूषण मनोहर साळुंखे यांनी व्यक्त केले.

नागठाणे, (ता.सातारा) येथे छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व व कौशल्य विकास अभियान अंतर्गत महाराष्ट्र कृषी कौशल्य कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमांतर्गत नागठाणे येथे शेतकर्‍यांसाठी तीन दिवशीय शेती प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कृषी सहायक अंकुश सोनवणे,बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार,प्रशिक्षक शिवमसिंह यादव, संभाजी चव्हाण, नागठाण्याचे सरपंच विष्णू साळुंखे-पाटील,ग्रामविकास अधिकारी सचिन पवार, मंडलाधिकारी नारायण जावलीकर, विकास जाधव ,सर्कल समन्वयक नितीन साळुंखे तसेच नागठाणे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साळुंखे पुढे म्हणाले, महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम हा महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत असून शेतकर्‍यांनी गटशेती बाबत जागृत व्हावे. शेतकरी, तरुण, उद्योजक आणि रोजगार शोधणार्‍या व्यक्तींनी एकत्र यावे. अल्पभूधारक शेतकर्‍यांनी आर्थिक प्रगती करून आधुनिक शेती पद्धतीसंबंधी प्रशिक्षण घ्यावे. गट शेती, शेतकरी, उत्पादक कंपनी, बाजार यंत्रणा, शेतमाल विक्री याचे प्रशिक्षण घेवून आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळाल्यास शेतकरी गटांना बाजारातील विविध संधीचा फायदा होईल यात शंका नाही. अलिकडे गटशेती ही संकल्पना कृषी विकासासाठी फायदेशीर ठरत असून गावात शेतकर्‍यांनी एकत्रित येवून जास्तीत जास्त गट स्थापन करावेत गटातून शेतीविषयक समस्या सोडवण्यावर भर द्यावा.यावेळी बोरगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांनी हुमणी या किडी संदर्भात मार्गदर्शन केले तर कृषी सहायक अंकुश सोनवणे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकर्‍यांना दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पूजा बनकर यांनी केले तर आभार पल्लवी घोरपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष मोहिते यांनी परिश्रम घेतले.