Breaking News

पाणीयोजनेत नसणार्‍या भागाचा पाणीप्रश्‍न गंभीर

पाणीप्रश्‍न गंभीर साठी इमेज परिणाम
अहमदनगर /प्रतिनिधी : केडगाव उपनगरातील अनेक नवीन झालेल्या वसाहतींचा पाणीप्रश्‍न सध्या गंभीर झाला असून केडगाव पाणीपुरवठा योजनेत समावेश न झालेल्या भागांमध्ये प्रस्तावित केलेले जलवाहिन्या टाकण्याचे काम तातडीने सुरू करून या पाण्यापासून वंचित भागाचा पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत नगरसेवक कोतकर यांनी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांची गुरुवारी (दि.16) दुपारी भेट घेऊन निवेदन दिले.
यामध्ये म्हटले आहे की, “महापालिकेच्या हद्दवाढीत केडगाव ग्रामपंचायतचा सामवेश महापालिका हद्दीत झालेला आहे. त्यावेळचे केडगाव आणि आजचे केडगाव यात मोठा फरक झालेला आहे. नगर शहराच्या विस्तारीकरणाला पूर्व पश्‍चिम भागात मर्यादा असल्याने दक्षिण भागात असलेल्या केडगाव परिसरात दिवसेंदिवस लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.केंद्रशासनाच्या निधीतून केडगाव पाणीयोजना राबविली गेली आहे. मात्र केडगाव पाणीपुरवठा योजनेमध्ये केडगावच्या विस्तारित नवीन भागांचा सामावेश केला गेला नसल्यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाने या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने राहिलेल्या भागाचे काम पूर्ण करण्यास ठेकेदाराला सांगितले आहे. परंतु ठेकेदार व प्रशासनाच्या वादामध्ये हे काम पूर्ण होवू शकले नाही. प्रशासनाकडून व ठेकेदाराकडून भागातील नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या प्रश्‍नात आयुक्तांनी स्वत: लक्ष घालून येत्या आठ दिवसात महापालिका प्रशासनाने या भागातील पाणीप्रश्‍न कायमस्वरूपी निकाली काढावा व या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा’’, अशी अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली आहे.