Breaking News

..तर मोदींना जेलमध्ये टाकू ममता बॅनर्जी यांची धमकी

ईश्‍वरचंद्र विद्यासागरांची मूर्ती आम्ही फोडल्याचे सिद्ध करा

Image result for ममता बॅनर्जी
कोलकाताः  कोलकत्यात भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराचे राजकारण अजून शांत झालेले नाही. या वेळी थोर विचारवंत ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती फोडण्यात आली होती. ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला होता. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यावर मोदी यांना थेट जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली आहे. आरोप सिद्ध करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे.
कोलकत्यातल्या एका महाविद्यालयात असलेली ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांची मूर्ती मंगळवारच्या हिंसाचारात फोडलेली आढळली होती. त्यावरून भाजप आणि तृणमूलमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ही मूर्ती तृणमूलच्या गुंडांनी फोडली, असा आरोप शाह आणि मोदी करत आहेत, तर ही मूर्ती भाजपच्याच कार्यकर्त्यांनी फोडली,  असा ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे. ममता म्हणाल्या, की बंगालची जनताच आता विद्यासागर यांची मूर्ती बनवून देईल. हिंसाचारात ज्या महाविद्यालयाचे नुकसान झाले, ते 200 वर्ष जुने होते. त्याची भरपाई भाजप करून देणार आहे का? ही मूर्ती तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचे आरोप सिद्ध करा नाही, तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये घेऊन गेल्याशीवाय राहणार नाही असा इशाराच त्यांनी मोदी आणि शाह यांना दिला.
बॅनर्जी यांनी मोदी आणि शाह यांच्या विरोधात जी भाषा वापरली, त्याच्या विरोधात भाजपने आज मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. देशाच्या पंतप्रधानांविरूद्ध अशी भाषा वापरणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. मी जी भाषा वापरली ती योग्यच होती. त्याबद्दल मला खेद नाही. मी जेलमध्ये जायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच थेट ‘अ‍ॅक्शन’ घेत बंगालमध्ये प्रचाराचा एक दिवस कमी केला. त्या टायमिंगवरूनही आता घमासान माजले आहे. एकाबाजूने काँग्रेस, मायावती यांनी मोदी यांच्यासह निवडणूक आयोगावर घणाघाती प्रहार केल्यानंतर बॅनर्जी यांनीही तोच कित्ता गिरवला. ममता यांनी मथुरापूर येथे झालेल्या रॅलीत निवडणूक आयोगावर वाग्बाण सोडत कडाडून हल्ला चढवला.  त्या म्हणाल्या, की काल (ता.15) आम्हाला भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. मोदी यांच्या सभेनंतर आम्ही सभा घेऊ शकत नाही.

चौकट
निवडणूक आयोग भाजपचा भाऊ

निवडणूक आयोग भाजपचा भाऊ आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष संस्था होती. आता ती संस्था भाजपला विकली गेल्याचे सर्व देश म्हणत आहे, मला असे बोलताना दु:ख वाटत आहे; पण माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच नाही. असे बोलण्याने मला जेलमध्ये जावे लागले तरी मी तयार आहे; पण सत्य बोलण्यासठी घाबरत नाही, असे उघड आव्हान त्यांनी दिले.