Breaking News

संगमनेर तालुक्यात दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच


संगमनेर/प्रतिनिधी: पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने गेल्या महिन्यात टँकरच्या पाण्याचा नमुना घेऊन त्याची तपासणी केली असता दोन टँकरमधून पिण्यासाठी दिले जाणारे पाणी दुषित आढळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आठवडाभराच्या कालावधीत दोनदा याच टँकरमधील पाणी दुषित आढळले आहे. दुषित पाणी आढळूनदेखील नागरिक हेच पाणी पित असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासन याकडे जाणूनबुजून डोळेझाक तर करत नाही ना असा प्रश्न आता पडला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी असेच फेसाळलेले पाणी टँकरमधून पुरवले होते.

संगमनेरमध्ये ४१ गावे आणि २५० वाड्यांसाठी ५६ टँकर सुरु आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात माणसी २० लिटरप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी गेल्या आठ वर्षात वाढलेली लोकसंख्यादेखील विचारात घेतली गेलेली नाही. त्यामुळे टँकरद्वारे दिल्या जाणाऱ्या पाण्यावर ग्रामस्थांची तहान भागत नाही. अशा स्थितीत दिले जाणारे पाणीदेखील दुषित आढळल्याने प्रशासन लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसते. दुषित पाण्यामुळे साथीच्या आजारांची शक्यता बळावली आहे. नागरिकांना पाणी देणे ही प्रशासनाची जबाबदारी असली तरी दिले जाणारे पाणी शुध्द नसल्याचे आरोग्य विभागाच्या पडताळणीत समोर आले.

सुरु असलेल्या टँकरपैकी एप्रिलमध्ये चोवीस टँकरच्या पाण्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीत १६ एप्रिलला कोकणगाव आणि शिवापुर येथे पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टँकरची तपासणी करण्यात आली. टँकरमधील पाणी तपासणीसाठी ताब्यात घेऊन ते नगरच्या लॅबमध्ये तपासले असता हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळले. त्यानंतर पुन्हा याच टँकरची २२ एप्रिलला तपासणी केली असता त्यावेळीदेखील हे पाणी दुषित आढळले. या दोन्ही वेळेस सदरचे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल दिला गेला, मात्र तरीदेखील नागरिकांना हेच पाणी पुरवण्यात आल्याचे समोर आले.

पिण्यासाठी दिले जाणारे पाण्याचे टँकर विहीरीवरुन भरले जातात. अशा प्रकारचे पाण्याचे दुषित नमुने गेल्या महिन्यात आढळलेले नाहीत. संबधित विभागाने ते पाण्याचे नमुने कोठून घेतले ते बघावे लागेल. संगमनेर शहर आणि परिसराला नगरपरिषदेच्या व संगमनेर खुर्द येथील विहीरीवरुन पाणी दिले जाते तेच पाणी टँकरद्वारे दिले जात आहे.

-सुरेश शिंदे (गटविकास अधिकारी, संगमनेर)