Breaking News

मार्केट यार्डमधील पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर छापा

छापा साठी इमेज परिणाम
अहमदनगर /प्रतिनिधी : मार्केट यार्डमधील पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेसमधून आठ प्रकारच्या मुदतबाह्य कीटकनाशकांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाचे मोहीम अधिकारी राजेश जानकर यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कृषी विभागाच्या बी-बियाणे गुणवत्ता नियंत्रण पथकाने आज नगरच्या मार्केटयार्डमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके विक्री करणार्‍या पृथ्वी सर्व्हिसेसच्या गोदामावर सायंकाळी 4 वाजता छापा घातला. या गोदामात मुदतबाह्य कीटकनाशकांचा कोट्यावधी रुपयांचा साठा असल्याचे समोर आले. सुमारे 2,01,62,017 आणि 2018 सालामधील 8 विविध प्रकारची मुदतबाह्य कीटकनाशके या गोदामांमध्ये होती. ह्या मुदतबाह्य कीटकनाशकांवरील वेस्टन बदलून तेथे नव्याने दुसरे छापील वेस्टन लावून त्याची विक्री पृथ्वी सर्व्हिसेस मधून होत असल्याचेही पथकाच्या तपासात समोर आले आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाला याची माहिती खबर्‍याकडून मिळाल्यानंतर तिथे छापा घातला.
मुदतबाह्य कीटकनाशकावरील वेस्टन बदलून नव्याने वेस्टन लावण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य कृषी विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले असून त्यामध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या वेस्टन, शिक्के, बाटल्या, ब्लेड आणि थिनर आदी साहित्यांचा यात समावेश आहे.
कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाचे मुख्य नियंत्रक दीपक पाटील, मोहीम अधिकारी राजेश जानकर, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नीतनवरे आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. आर.देशमुख यांच्या पथकाने कारवाई केली.
पृथ्वी सर्विसच्या संचालकांनी विरुद्ध फौजदारी खटला दाखल करून बी-बियाणे विक्रीचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही कृषी विभागामार्फत केली जाईल, अशी माहिती मोहीम अधिकारी राजेश जानकर यांनी दिली.