Breaking News

भाजप-तृणमूलमध्ये आता वाकयुद्ध!Image result for भाजपा-तृणमूल मध्ये आता वाकयुद्ध!
पश्‍चिम बंगालमधील हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप; सोईचे पुरावे सादर करण्याची स्पर्धा
नवीदिल्लीः कोलकात्यामध्ये भाजपच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर अध्यक्ष अमित शाह यांनी एका पत्रकार परिषदेत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचे सरंक्षण नसते, तर मी वाचू शकलो नसतो, असे ते म्हणाले; परंतु तृणमूल काँग्रेसने शाह यांचे आरोप फेटाळून लावताना भाजपच्या कार्यकर्त्यांनीच दंगे घडविल्याचा आरोप केला. शाह आणि तृणमूलच्या नेत्यांनी स्वतःच्या समर्थनार्थ वेगवेगळे व्हिडिओ दाखविले.

रोड शोमध्ये काही विद्यार्थी गोंधळ करतील, अशी शक्यता वर्तविली असूनही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली नाही, असा आरोप शाह यांनी केला.
या हिंसाचारामध्ये समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचे आरोप शाह यांनी फेटाळून लावले.
आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत काही फोटो दाखवले. कॉलेजचे गेट बंद असल्याचा फोटो शाह यांनी दाखवला. महाविद्यालयाच्या आत जाऊन एका खोलीत असलेला पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्ते कसे करू शकतात, असा त्यांनी प्रश्‍न उपस्थित केला. संबंधित प्रकार हा संध्याकाळी साडेसात वाजता घडला. त्यावेळेस कॉलेज बंद झाले होते. त्यामुळे कुलूप उघडून आम्ही आतमध्ये जाऊन तोडफोड करू शकत नाही, असा युक्तिवाद शाह यांनी केला.

खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी आणि मतांचे राजकारण करण्यासाठीच तृणमूल काँग्रेसने विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली असल्याचा आरोप शाह यांनी केला. विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड ही ममता बॅनर्जींचे दिवस फिरल्याचे चिन्ह आहे, असे ते म्हणाले. शाह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकार परिषद घेतली. शाह खोटारडे आहेत, असा आरोप त्यांनी केला. आपला मुद्दा मांडण्यासाठी त्यांनी अनेक व्हिडिओ आणि फोटो दाखवले. भाजप कार्यकर्त्यांनी ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडल्याचा आरोप त्यांनी केला. भाडोत्री गुंडातर्फे हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला. आमच्याकडे फोटोंच्या रुपात दोन पुरावे आहेत. त्यावरून भाजप आणि केंद्रीय राखीव दलांचे संगनमत असल्याचे सिद्ध होते, असाही आरोप त्यांनी केला आहे. 

पश्‍चिम बंगालमध्ये घोटला लोकशाहीचा गळा

भाजप वेगवेगळ्या राज्यांत तिथल्या प्रादेशिक पक्षांविरोधात लढत आहे; पण तिथे हिंसाचाराच्या घटना घडल्या नाहीत. बंगालमध्ये मात्र प्रत्येक टप्प्यावर हिंसाचार झाला. इथे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, अशी टीका शाह यांनी केली.
पंचायतीच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. 60 कार्यकर्त्यांची हत्या झाली. हे सर्व कार्यकर्ते विरोधी पक्षाचे होते. बहुतांश कार्यकर्ते तर भाजपचेच होते. हिंसाचाराच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू असे ममता बॅनर्जींना वाटत असेल; पण बंगालची जनता कधीही हिंसेचे समर्थन करणार नाही, असे ते म्हणाले.

भाडोत्री गुंडांकरवी हिंसाचार

भाजपने बाहेरून गुंड बोलवून तणाव निर्माण केला आणि हिंसाचार घडवून आणला, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. हिंसाचारानंतर बॅनर्जी यांनी शाह यांच्यावर कडाडून टीका केली. शाह स्वतःला कोण समजतात? ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत का? त्यांना कुणी विरोध न करायला ते देव लागून गेलेत का? असे सवाल त्यांनी केले.

तृणमूल नेत्यांनी बदलले डीपी

ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड भाजप कार्यकर्त्यांनीच केली, या आरोपावर तृणमूल काँग्रेस ठाम आहे. भाजपच्या या कथित कृत्याचा निषेध करण्यासाठी बॅनर्जी आणि तृणमूलच्या अन्य नेत्यांनी त्यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरील डीपी बदलले आहेत. या सर्व नेत्यांनी डीपी म्हणून ईश्‍वरचंद्र विद्यासागर यांचा फोटो ठेवला आहे.