Breaking News

मालवाहू विमानाची भारतीय हद्दीत घुसखोरी जॉर्जीयाचे विमान जयपूरला उतरवले

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर सील झालेल्या पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून आज, शुक्रवारी एका मालवाहू विमानाने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेच्या सुखोई विमानांनी लगेच या विमाला गराडा घालून त्याला जयपूर विमानतळावर उतरण्यास भाग पाडले. हे विमान जॉर्जीयाचे असून त्याने कराचीहून उड्डाण केले होते. हे मालवाहू विमान भारतीय हवाई क्षेत्रात येताच भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी लगेचच हवेत झेप घेतली आणि त्या विमानाचा पाठलाग केला. मालवाहतूक विमानाच्या पायलटला विमान जयपूर विमानतळावर उतरवण्याचे आदेश दिले. या प्रकाराबाबत पायलटची चौकशी करण्यात येत असून हे विमान दिल्लीला जात होते, अशी माहिती पुढे आली आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द विमानांसाठी बंद केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानेही वळसा घालून भारतात किंवा पलिकडे जात-येत आहेत. यामुळे बंदी असतानाही अँटोनोव्ह एएन-12 हे मोठे मालवाहतूक विमान पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून भारतीय हवाई हद्दीत आलेच कसे, यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या विमानातून कशाची वाहतूक केली जात आहे. त्या विमानाला पाकिस्तानने का नाही रोखले, असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.