Breaking News

भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवल्याबद्दल प्राध्यापक निलंबित


भोपाळ : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवल्याबद्दल मध्य प्रदेशातील उज्जैनमधील विक्रम विद्यापीठातील प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशावरुन प्राध्यापक डॉ. राजू मुसळगावकर यांना निलंबित करण्यात आले आहे. विक्रम विद्यापीठात ते संस्कृत विषय शिकवतात. सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांनी भाजपाच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता.
मध्य प्रदेशातील विक्रम विश्‍वविद्यालयातील ज्योतिष प्राध्याप्रकाने भाजपला 300 जागा मिळतील अशी भविष्यवाणी केली. त्यानंतर वादाला सुरूवात झाली. फेसबुकवर राजेश्‍वर शास्त्री मुसळगांवकर यांनी पोस्ट लिहिल्यानंतर मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. 

आचारसंहिताभंगाच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 28 एप्रिल रोजी राजेश्‍वर शास्त्री मुसळगांवकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर बुधवारी विद्यापाठाने त्यांना निलंबित केल्याची माहिती दिली. पण, राजेश्‍वर शास्त्री मुसळगांवकर यांनी आपली पोस्ट फेसबुकवरून हटवली होती. शिवाय, माफी देखील मागितली होती. त्यानंतर फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी माझ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाच्या आधारे अंदाज वर्तवला. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माफी असावी असे त्यांनी म्हटले होते. राज्य युवक काँग्रेसचे सचिव बबलू खिनची यांनी मुसळगावकर यांच्या पोस्टविरोधात तक्रार केली व त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. भाजपाला अनुकूल पोस्ट करुन आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप बबूल खिनची यांनी केला होता. डॉ. मुसळगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांचे उत्तर तपासल्यानंतर विभागीय आयुक्तांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.