Breaking News

जाचक अटी शिथिल करून ५० टक्के देयके अदा करू


श्रीगोंदे/ प्रतिनिधी: चारा छावणीसाठी असणाऱ्या शौर्य अँप मधील अटी शिथिल करण्याचे व प्रलंबित देयकापैकी ५० टक्के रक्कम तातडीने अदा करण्याचे आश्वासन राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी दिले. जी.प.महिला बाल कल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे यांनी यासाठी छावण्यांना भेटी दिल्यांनतर शिंदे यांची भेट घेऊन पाठ पुरावा केला होता.

तालुक्यातील छावणीला शनिवारी अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी भेट दिली होती. त्यावेळी छावणी चालक तसेच पशुधन पालक शेतकरी वर्गाने अपुराचारा, अपुरे अनुदान, ऑनलाइन माहिती, बिल्ले, प्रलंबित देयके बाबत तसेच पाण्याचे टॅंकर, पीकविमा, कुकडीचे चालू आवर्तन बाबत व्यथा मांडल्या होत्या. त्यावरकाल (रविवार) अनुराधा नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली छावणी चालक तसेच कारखाना संचालक सुभाष शिंदे, आप्पासाहेब काकडे,रमेश गायकवाड,हेमंत नलगेआदींच्या शिष्टमंडळाने ना.राम शिंदे यांची चौंडी येथे भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यावर ना.शिंदे यांनी अटी शिथिल करण्याबाबत लक्ष घालण्याचे तसेच प्रलंबितदेयका पैकी ५०टक्के रक्कम अदा करण्या बाबत अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच १५ किलो ऐवजी१८ किलो चारा देण्याचे व वाढीव अनुदान दिले जाणार असल्याचे सांगितले.

कुकडी लाभक्षेत्रातील गावांमध्ये तसेच बेलवंडी गटातील सर्वच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असल्याने शिंदे यांनी तातडीनेवरील गावातील सर्व तलाव, साठवण तलावात पाणी सोडण्याचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना आदेश दिल्याचे अनुराधा नागवडे यांनी सांगितले. तसेचपीकविम्याबाबत बोलताना कंपनी कडे तांत्रिक अडचण निर्माण झाली असून अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल असे शिंदे म्हणाले.