Breaking News

चारा छावणीच्या प्रलंबित प्रस्तावावर तत्काळ निर्णय घ्या


सातारा : माण तालुक्यात शासनाने मंजूर केलेल्या चारा छावण्या सुरु आहेत. माण तालुक्यातील मोगराळे व वडगाव या चारा छावण्यांस बुधवारी भेट दिली. चारा छावणीतील जनावरांना शासनाच्या निकषानुसार चारा, पेंड व पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. चारा छावणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी प्रलंबित असल्यास त्यावर तत्काळ निर्णय घ्या, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी केल्या.

दहिवडी येथील तहसील कार्यालयात टंचाई आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपायुक्त प्रतापराव जाधव, उपायुक्त निलीमा धायगुडे, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, फलटणचे प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रोहयोंतर्गत सार्वजनिक कामांचे प्रस्ताव आले तर त्यास तत्काळ मंजुरी द्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले, टँकरच्या खेपा शंभर टक्के होण्यावर भर द्या, टँकरचे मॉनिटरींग जीपीएसच्या माध्यमातून मोबाईलद्वारे करावे. हे काम संबंधित तालुक्याचे तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनी करावे. टँकरच्या खेपा लॉगबूकशीटशी पडताळून पहावे. धरणातून सोडण्यात येणारा पाणीसाठा हा फक्त पिण्यासाठीच उपलब्ध करुन देण्यात यावा, शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱयांनी घ्यावी. तसेच चारा छावण्यांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचनांचे पालन चारा छावण्या तंतोतंत करतील यासाठी अधिकाऱयांनी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या.