Breaking News

नागपूर खैरलांजी आंदोलकांची निर्दोष सुटका

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी येथील भोतमांगे कुटुंबाच्या हत्याकांडानंतर नागपुरातील आंदोलनात सहभागी झालेल्या पन्नासहून अधिक आंदोलकांची आज, शुक्रवारी सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे न्या. तृप्ती मिटकरी यांनी या आंदोलकांची निर्दोष मुक्तता केली.

खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी 6 नोव्हेंबर 2006 रोजी इंदोरा चौकात तीव्र आंदोलन केले होते. जरीपटका पोलिसांनी एफआयआर नोंदवून या आंदोलनकर्त्यांना अटक केली होती. तसेच, तपासानंतर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात भादंविच्या कलम 143, 144, 145, 147, 149, 353, 336, 435, 427, 306 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल केले होते. या आंदोलकांमध्ये संजय महादेव मेश्राम, पंकज वामन लोणारे, बाळू जीवन घरडे, दिनेश गोपीचंद अंडरसहारे, अमोल वामन लोणारे, रत्नमाला इंदल मेश्राम, जितेंद्र दुर्गाप्रसाद पाली, धर्मपाल रवी चौधरी, शीलकुमार सुरेश सहारे, पुरणसिंग मुकुटसिंग ठाकूर, बालअटलसिंग जबरसिंग गुर्जर, अनुरोध नारायण डोंगरे, भोजवल छत्रपती ओंकार, चिंतामण शाहू, रामबहादूर जबरसिंग ठाकूर, रामसिंग गुर्जर, अमर महादेव मेश्राम, मोरेश्‍वर किसन जुनघरे, भीमराव पांडुरंग खोब्रागडे, योगेंद्र कृष्णा नगराळे, प्यारेलाल मोतीसिंग इलनकर, विक्की संतोष तायडे, सचिन रामप्रसाद बोंदिले, देवानंद दौलत शेंडे, दिवाकर प्रभाकर मेंढे, रुपेश मनोहर बोरकर, राजेश पुंडलिक झोडापे, आशिष शंकर मेश्राम, राहुल प्रकाश मंडपे, धनंजय नारायण कांबळे, नितीन नेहरू उके, संदीप ऊर्फ लंगड्या लोखंडे, गणेश सुखदेव पुनवटकर, मनीष ऊर्फ बंटी जांभुळकर व इतरांचा समावेश होता. त्यांच्यावर जनतेच्या भावना भडकवून पोलिसांवर दबाव आणणे, पोलीस चौकी ताब्यात घेणे, टायर जाळून रस्ता बंद करणे, येणार्‍याजाणार्‍यांना मारहाण, दगडफेक व वाहनांची तोडफोड करणे, कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले, पोलीस ठाण्यातील कागदपत्रे फाडणे, पोलीस ठाण्यातील दुचाकी वाहने जाळणे, सरकारी वाहने जाळणे, पेट्रोल बॉम्बचा मारा करून पोलिसांना ठार मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी आरोप होते.