Breaking News

दुष्काळ नावाचा कलंक कायमस्वरूपी पुसण्यासाठी टिकाव - खोरे ग्रामस्थांच्या हाती


सिद्धार्थ सरतापे / वरकुटे-मलवडी : पाणी हे बहुमोल आहे,ते उपलब्ध करण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. आपल्या गावचे आपणच तारणहार आहोत असं म्हणून माण तालुक्यात महाबळेश्र्वरवाडी गावातील गांवकारभारी महिलाशक्तीसह लहान थोर, आपले गांव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. दररोजच सकाळच्या प्रहरी पाचशेहून अधिक लोकं धुमधडाक्यात श्रमदान करीत आहेत.

’दुष्काळ’ नावाचा कलंक कायमस्वरूपी पुसण्यासाठी ना गप्पा.. ना चर्चा.. फक्त टिकाव..खोरे.. अन्‌ पाटिचाच आवाज करित,खाली मान घालून निष्ठेने आणि पावसाच्या ’आशेने’श्रमदात्यांच्या घामाच्या धारेने भिजत सारा गांव श्रमदान करीत आहे.आता आपला गांव दुष्काळमुक्त करायचाच हा निर्धार महाबळेश्र्वरवाडी करांनी केला असून,सीसीटी, शोषखड्डे, दगडी बांध या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. तसेच शिवार फेर्‍या काढून यापुढील काळात जलसंधारणासाठी कोणती कामे करता येतील, याबाबत नियोजन करण्यात आले आहे.
सध्या उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त गावी आलेले पुणे मुंबईकर शेतकर्‍यांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. गावचे सरपंच,उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी, लहान थोर आदी आपल्या गावासाठी संपूर्ण वेळ देत आहेत. आपल्या कुटूंबियासह उपसरपंच, सदस्य, स्थानिक नागरिक या सर्वांच्याच हातामध्ये टिकाव, फावडे, पहार अशी कामे करण्याची अजवाजारे पाहायला मिळत आहेत.गावातील श्रमदान करणार्‍या शेतकर्‍यांचा उत्साह वाढावा याकरिता मुंबई नगरीचे. अतिरिक्त आयकर आयुक्त नितीन वाघमोडे यांनी भेट देवून ग्रामस्थांसमवेत श्रमदान करून मार्गदर्शनही केले आहे.