Breaking News

आयपीएस राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती उठविली

Image result for आयपीएस राजीव कुमार यांच्या अटके वरील स्थगिती उठवली

नवीदिल्लीः शारदा चिटफंड प्रकरणी पश्‍चिम बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले, की सीबीआय आपले काम करू शकते; मात्र हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. या दरम्यान राजीव कुमार कायदेशीर पावले उचलू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना दणका बसला आहे.

कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर अटकेची टांगती तलवार  कायम आहे. सीबीआय त्यांना सात दिवसांनंतर अटक करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, की या सात दिवसांच्या कालावधीत कुमार आपल्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करू शकतात. जर त्यांना जामीन मिळाला नाही, तर सीबीआय त्यांना अटक करू शकते. राजीव कुमार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या शारदा चिटफंड घोटाळ्यातील पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. सीबीआयने आरोप केला आहे, की बड्या नेत्यांना वाचवण्यासाठी कुमार यांनी घोटाळ्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाता याचिका दाखल करत राजीव कुमार यांना अटक करून चौकशी करण्याची मागणी केली होती.

या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने चिटफंड घोटाळ्याच्या तपासाच्या प्रगतीबाबतही चिंता व्यक्त केली. आतापर्यंत या प्रकरणी झालेला तपास समाधानकारक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.