Breaking News

मोदींचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ हा देशावरचा काळा डाग : मायावती

Image result for mayawati

लखनऊः  मायावती जितक्या काळ उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री होत्या, त्याच्यापेक्षा अधिक काळ मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. या मोदींच्या विधानावर मायावती यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की गुजरातमधील मोदी यांचा कार्यकाळ हा केवळ भाजपवरचाच नाही, तर संपूर्ण देशावरचा काळा डाग आहे; मात्र जेव्हा बसप उत्तर प्रदेशात सत्तेत होता, तेव्हा उत्तर प्रदेश दंगली आणि अराजकतामुक्त होता, अशा शब्दांत त्यांनी स्वतःची पाठही थोपटून घेतली.

मायावती म्हणाल्या, की पंतप्रधानांनी बसपला ‘बेहेनजीकी संपत्ती पार्टी’ असे संबोधले आहे. बसपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे जे काही आहे, ते आमच्या शुभचिंतकांनी आणि समाजाने दिलेले आहे, यात काहीही लपून राहिलेले नाही. बसपला वैयक्तिक संपत्ती संबोधताना पंतप्रधानांनी आपल्या पदाच्या सर्व मर्यादा पार केल्याचा आरोप त्यांनी केला. कालच पत्रकार परिषदेत मोदी यांच्यावर आरोप करताना मायावती यांनी म्हटले होते, की मोदी सरकारचा आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे त्यांचे जहाज आता बुडायला लागले असून त्यामुळे मोदी आता चिंताग्रस्त झाले आहेत.
तत्पूर्वी राजस्थानातील अलवर येथील 19 वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून मोदी यांनी मायावती यांच्यावर टीका करताना त्या मगरीचे अश्रू ढाळतात, असा टोला लगावला होता. तसेच मायावती यांनी या प्रकरणावरून राजस्थानातील काँग्रेस सरकारचा पाठींबा काढायला हवा, असे म्हटले होते. तेव्हापासून यो दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी सुरूच आहेत.