Breaking News

दखल जेट, एअर इंडियाच्या वाटेवर इंडिगो!

देशाचं हवाई क्षेत्र सध्या भलत्याच अडचणीतून जात आहे. विमान वाहतूक कंपन्यांच्या गळेकापू स्पर्धेमुळं प्रवाशांचा फायदा झाला असला आणि मध्यमवर्गीयांच्या खिशाला विमानानं प्रवास करणं सुसह्य झालं असलं, तरी प्रत्यक्षात त्यामुळं कंपन्यांचा तोटा वाढत चालला आहे. गैरव्यवस्थापन, नियोजनचा अभाव यामुळं जशा विमान वाहतूक कंपन्या अडचणीत आल्या, तशा उच्चपदस्थ भागीदारातील मतभेद हे ही एखाद्या कंपनीला अडचणीत आणू शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंडिगो!

भारतात गेल्या काही वर्षांपासून विमान वाहतूक कंपन्या अडचणीत येत आहेत. दमानिया एअरवेजसह काही कंपन्या फार पूर्वीच बुडाल्या. किंगफिशरसह ही अतिशय चांगली कंपनी आपआपसातील गळेकापू स्पर्धेमुळं लयाला गेली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रात सदासर्वकाळ नफा होतोच असं नाही. कधी कधी भांडवल ओतावं लागतं. पूर्वीचंच दिलेलं कर्ज फिटलं नसताना असं भांडवल द्यायला मग वित्तीय संस्था हात आखडता घेतात. त्यातून किंगफिशर बुडाली. किंगफिशरला दुसर्‍या एखाद्या कंपनीत विलीन करणं शक्य होतं. तिला जादा भांडवल पुरवून तात्कालिक अडचणीतून बाहेर काढणं शक्य होतं; परंतु तसे प्रयत्न झाले नाहीत. अतिरिक्त भांडवलाची जोखीम न घेतल्यानं मूळचं नऊ-दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज आणि कंपनीही बुडाली. जेट एअरवेजच्या बाबतीत बँका सुरुवातीला अतिरिक्त भांडवल गुंतवायला तयार होत्या; परंतु नंतर त्यांनी हात आखडता घेतला. सौदी अरेबियाची कंपनी आता भांडवल गुंतवायला तयार झाली आहे. एखादी कंपनी बुडाली, तर वित्तीय संस्थांचं कर्ज बुडण्यापुरता परिणाम मर्यादित राहत नाही. हजारो कामगार देशोधडीला लागतात. भारत सरकारचं भाग-भांडवल असलेली एअर इंडिया पन्नास हजार कोटी रुपयांहून अधिक गाळात गेली आहे. या कंपनीत निर्गुंतवणूक करण्याचा कितीतरी वेळा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आलं नाही. या पार्श्‍वभूमीवर अन्य कंपन्यांही बोध घ्यायला हवा होता. विमान कंपन्यांकडं प्रवाशी आकर्षित झाले असले आणि त्यांची संख्या वाढत असली, तरी केवळ ती कमीदराच्या स्पर्धेमुळं न वाढता सेवेतील स्पर्धांमुळं आणि वेळा पाळण्याच्या काटेकोर पद्धतीमुळं वाढायला हवी. जेट सध्या अडचणीतून जात आहे. तिच्याकडील विमानं भाड्यानं घेण्याचा प्रयत्न काही कंपन्यांनी चालविला आहे. देशांतर्गत आणि जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील इंडिगोचा वाटा मोठा आहे. अशा पार्श्‍वभूमीवर या कंपनीला आपला व्यापारहिस्सा वाढवण्याची संधी आहे. नेमक्या याच संधीवरून इंडिगोच्या उच्चपदस्थांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत. मोठ्या कंपन्या बाजारातील भांडवलावर चालत असतात. कंपनीबाबत कुठं काही खट्ट वाजलं, की त्याचा परिणाम भांडवली बाजारावर होत असतो. त्यामुळं उच्चपदस्थांतील कलह, मतभेद शक्यतो केबिनच्या बाहेर येता कामा नये. तसे झाले, तर त्याचा कंपनीच्या प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. इंडिगो हे त्याचे उदाहरण.

व्यवसाय ठप्प झालेल्या जेट एअरवेजच्या ताफ्यातील विमाने तसेच कर्मचारी आपल्याकडे अहमहमिकेने ओढून घेणार्‍या स्पर्धक इंडिगोमध्ये वर्चस्वाचा तिढा निर्माण झाला आहे. या खासगी नागरी विमान सेवेच्या दोन प्रवर्तकांमधील वाद चव्हाटयावर आल्याने गुरुवारी भांडवली बाजारात कंपनीचे समभागमूल्य दणक्यात आपटले.
इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी या वादाच्या पार्श्‍वभूमीवर, एकूणच नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ खुंटली असून काही कालावधीसाठी साचलेपण येणे अपरिहार्य असेल, असे स्पष्ट केले. कंपनीतील व्यवस्थापन वर्चस्ववादाची अप्रत्यक्ष कबुलीच दत्ता यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. इंडिगोची प्रवर्तक इंटरग्लोब एव्हिएशनचे दोन प्रवर्तक राहुल भाटिया व राकेश गंगवाल यांच्यातील कंपनीवरील वर्चस्वावरून निर्माण झालेल्या वादाने गंभीर रूप धारण केले आहे. कंपनीत सध्या भारताबाहेरील व्यवसायाची जबाबदारी असलेल्या गंगवाल यांनी इंडिगोच्या देशांतर्गत व्यवसायात वाढते लक्ष घातल्याने भाटिया यांची अस्वस्थतता वाढल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या तसेच क्षमता विस्ताराबाबत गंगवाल आग्रही असताना भाटिया यांनी त्यांच्या प्रस्तावाला विरोध केल्याने वाद झाला. गंगवाल-भाटिया वादाबाबत कंपनीकडून मात्र काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मुंबई शेअर बाजारानेही इंडिगोची प्रवर्तक इंटरग्लोब एव्हिएशनकडून उत्तर मागितले आहे. देशांतर्गत नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात जवळपास 50 टक्के हिस्सा असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये गंगवाल यांचा 36.69 टक्के तर भाटिया यांचा वाटा 38.26 टक्के आहे. ‘इंडिगो’ ही हवाई वाहतूक नाममुद्रा असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनचा समभाग, व्यवस्थापनातील वर्चस्ववाद चव्हाटयावर आल्याने गुरुवारच्या व्यवहारात 9 टक्क्यांपर्यंत आपटला. मुंबई शेअर बाजारात गुरुवारअखेर 8.82 टक्क्यांपर्यंत घसरल्यानंतर त्याचे समभागमूल्य 1,466.60 रुपयांवर स्थिरावले. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात 5,455.89 कोटी रुपयांनी रोडावत 56,377.11 कोटी रुपयांवर स्थिरावले. इंडिगोमधील प्रवर्तकांच्या वादाबाबत जेएसए लॉ व खेतान अँड कंपनी या कंपनी विधि सल्लागार आस्थापनांकडूनही मत मागविले आहे. 2006 मध्ये स्थापित इंटरग्लोब एव्हिएशनची 2013 मध्ये भांडवली बाजारात नोंदणी झाली तेव्हा भाटिया व गंगवाल यांचा एकत्रित हिस्सा 99 टक्क्यांपर्यंत होता.
भारतातील सर्वाधिक यशस्वी मानल्या जाणार्‍या इंडिगो एअर विमान कंपनीच्या प्रवर्तकांमधील मतभेदांमुळे संपूर्ण हवाई वाहतूक क्षेत्रालाच घरघर लागल्यासारखी परिस्थिती आहे. विमान कंपनी चालवण्यामध्ये नफा कमी आणि वलय अधिक अशीच परिस्थिती जगभर आढळून येते. यशस्वी विमान कंपनीचे कोणतेही सर्वमान्य असे सूत्र प्रस्थापित होऊ शकलेले नाही. या उद्योगासाठी भांडवल उभारणीच मुळात अतिशय खर्चिक असते. या क्षेत्रात कामगारवेतनही इतर अनेक उद्योगांच्या तुलनेत चढे असते. उत्पन्नाचे स्रोत अनिश्‍चित आणि बाह्यघटकांवर आधारित असतात. त्यात पुन्हा स्वस्तातल्या विमान सेवांनी परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनवली आहे.

जगात सध्या आर्थिक मंदीसदृश परिस्थिती आहे दुसरीकडं खनिज तेलांचे दर मात्र दररोज वाढत आहे. वाढता खर्च आणि उत्पन्न मात्र कमी अशा दुष्टचक्रातून सध्या विमान कंपन्यांची वाटचाल चालू आहे. मंदीचा थेट परिणाम प्रवाशी संख्येवर होत असतो. मंदीत पर्यटन उद्योग अडचणीत येतो. त्यामुळं बाहेर पडणार्‍यांचं प्रमाण कमी होतं. विमानं चालविण्याचा खर्च पाहिला, तर प्रवाशांची संख्या कमी होऊन चालत नसतं. इंधन महागल्यामुळं विमानवार्‍या खर्चीकही बनतात. भारतात तर विमान कंपन्यांवर विविध प्रकारच्या करांचाही भार येतो. अशा वेळी योग्य नियोजन आणि काटकसर होत नसेल, तर कंपनी डबघाईला जाण्यास वेळ लागत नाही. दमानिया एअरवेज, जेट एअरवेज, किंग फिशर, एअर इंडियानं काळाची पावलं ओळखली नाहीत. त्यामुळं त्या अडचणीत आल्या. इंडिगो त्याला अपवाद होती. योग्य नियोजन, काटकसरीचा कारभार यात कंपनीनं इतरांवर मात केली होती. राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल हे दोघे इंडिगोचे सहसंस्थापक आहेत. दोघांनाही विमान वाहतूक क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. इंडिगो कंपनी भारतात व्यवस्थित स्थिरावली असून, आता परदेशांतही विस्तारण्याची या कंपनीची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ परदेशस्थ भारतीय आणि परदेशी नागरिकांतून भरती करण्यावरून दोघांमध्ये मतभेद आहेत. यांतील एकाला हा विस्तार वेगानं व्हावा असं वाटतं, तर दुसर्‍यानं अधिक सावध पवित्रा अंगीकारलेला आहे. दोघांची मतं परस्परविरोधी आहेत. असं असलं, तरी मतभेद विकोपाला जाऊन त्यांचा कंपनीच्या परिचालनावर परिणाम होऊ नये, यासाठी दोघंही स्वतंत्र वकिलांचा सल्ला घेत आहेत. इंडिगो कंपनीचा सध्या स्थानिक बाजारपेठेत 47 टक्के हिस्सा आहे. 225 विमानं, दररोज 1400 उड्डाणं, देशांतर्गत 54 आणि परदेशात 17 गंतव्यस्थानं असा इंडिगोचा अवाढव्य कारभार. ए-320 निओचे सर्वात मोठे खरेदीदार असाही त्यांचा लौकिक आहे. जेट एअरवेजची सगळी आणि एअर इंडियाची काही विमानं जमिनीवर स्थिरावलेली असताना, या परिस्थितीचा फायदा इंडिगोनं उचलला पाहिजे, असा एक प्रवाह आहे. तसं करण्यासाठी कंपनीतील सर्वानी एकदिलानं आणि एकाच ध्येयानं काम करणं आवश्यक असतं. मतभेद सर्वत्रच असतात. तसे ते इंडिगोमध्येही असणं स्वाभावीक असलं, तरी या मतभेदाचा परिणाम कंपनीच्या परिचलनावर होता कामा नये. इंडिगोच्या बाबतीत त्याचा अभाव दिसतो.