Breaking News

बेशिस्त वडाप वाहतुकीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला


मोरगिरी / किशोर गुरव : पाटण तालुका हा डोंगराळ भाग असल्याने विभागातील मुख्य गावांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बस जात असते. परंतु, खेडोपाड्यातील छोट्या गावातील प्रवाशांसाठी तालुक्यातील प्रत्येक विभागात वडाप महत्वाचे साधन ठरत आहे. परंतु, काही वडाप चालक मद्यधुंद होऊन अतिवेगाने वडाप चालवत असल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागत आहे. संपूर्ण पाटण तालुक्यात वडाप जोमात असल्याने त्यातून प्रवास करणार्‍यांचा जीव मात्र टांगणीला लागत आहे.

दोनच दिवसापुर्वी पाटण वरून मोरगिरीकडे एक वडाप प्रवासी घेऊन येत होते, परंतु वडाप चालक एवढ्या वेगात होता की त्याला त्या चालकाला वडापवर नियंत्रण ठेवता आले नाही. चालकांच्या बेजबाबदारीमुळे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रक्टर ट्रॉलीला एका बाजूने थेट धडक दिली, ही धडक एवढी मोठी होती की त्यातील एका प्रवाशांच्या हाताला व पायाला जबर मार लागला. या प्रवाशांला कराड येथील खाजगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले तर त्यां प्रवाशाच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. अशा मद्यधुंद वडाप चालकांच्यावर संबधित विभागाने कडक कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून उमटत आहे.
काही वडापचे चालक नशा करून बेधुंद तर काही चालक मोबाईल कानाला लाऊन बिनधास्तपणे वेगात वडाप चालवत असतात. अनेक ठिकाणी चालकांच्याकडे लायसन्स नाहीत तर काहीच्याकडे वाहनांची कागदपत्रेच नाहीत. वडाप चालकांना कोणी काय समजावण्याचा प्रयत्न केला तर त्याच व्यक्तीला दमदाटी करत असतात शाळा, गाव आल्यानंतर वडापचा वेग कमी करावा अशी लोकांची अपेक्षा असते. परंतु अतिवेगाने वडाप चालवणार्‍या महाभागांना एकाद्या निष्पाप प्रवाशांचा जीव गेल्यावरच शहाणपण सूचणार का, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून ऐकायला मिळत आहे. 

एकंदरित मोरगिरी वडाप लाइनच्या काही चालकांच्या बेजबाबदारीमुळे संपूर्ण वडाप लाइनला गालबोट लागत आहे. त्यामुळे या बेजबाबदार चालकांच्यावर त्यांच्या वडाप संघटनेनेही कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.पाटण पोलिसांनी यावर योग्य ती कारवाई करून बेजबाबदार वडाप चालकांनची वेळीच वेसण आवळली पाहिजे. अन्यथा या वडाप चालकांचा बेजबाबदारपणा असाच सुरू राहून एकाद्या वेळेला मोठा अनर्थ घडला जाईल.