Breaking News

डाकघरमध्ये अपहार; सुपा डाकपालविरुद्ध गुन्हा

गुन्हा साठी इमेज परिणाम
अहमदनगर/प्रतिनिधी :  येथील मुख्य डाकघराच्या अख्यारीत असलेल्या सुपा डाकघर शाखेतील डाकपाल याने आवर्ती ठेव योजनेच्या खातेदारांच्या रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. डाक  पाल जालिंदर महांडुळे (रा. कोळ्याची वाडी ता. राहुरी) याच्याविरुद्ध बाळकृष्ण एरंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे. एरंडे यांच्या फिर्यादीनुसार सागर रसाळ 7 हजार 888, सोनाली रसाळ 16 हजार 213 आणि प्रणय भोगडे यांची 4 हजार 512 अशी एकूण 28 हजार 613 रुपयांची रक्कम या तिन्ही खात्यातून डाकपाल यांनी  काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. या अपहरामुळे  डाकघराच्या कामकाजाविषयी शंका उपस्थित होत आहेत.

एटीएममधून 8 लाख 38 हजार लंपास

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील एक आणि सावेडी उपनगरातील दोन, असे तीन एटीएम मशीन चोरांनी फोडले. यामध्ये दोन अ‍ॅक्सिस बँक आणि एक आंध्रा बँकेच्या एटीएम मशीनचा समावेश आहे.
केडगाव येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममधून चोरांनी 8 लाख 38 हजार रुपयांची रोकड लांबवली. सोमवारी पहाटेपासून चोरांनी एटीएम मशीन फोडण्याचा धिंगाणा सुरू केला. नगर-पुणे रोडवरील केडगाव परिसरातील जलाराम बेकरी शेजारील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम चोरांनी सुरुवातीला फोडले. त्यातून 8 लाख 38 हजार रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरट्यांनी सावेडी उपनगरातील एटीएम मशिनकडे मोर्चा वळवला. झोपडी कॅन्टीन परिसरातील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला. तिथे रक्कम न आढळल्याने चोरांनी गुलमोहर रोडवरील आंध्र बँकेचे एटीएम मशीन फोडले. परंतु या दोन्ही एटीएममध्ये चोरांना काहीच हाती लागले नाही.
एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरांनी गॅस कटरचा वापर केला होता. चोरांचा हा धिंगाणा पहाटे सहा ते सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता.
पोलिसांनी या चोरांना प्रोफेसर कॉलनी चौकात सकाळी पाहिले होते. तोफखाना पोलिसांनी या चोरांचा काही अंतरावर पाठलागही केला. परंतु चोर पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले.
एटीएम मशीन फोडण्याचा हा प्रकार एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार चोरांचा तपास सुरू केला आहे.