Breaking News

कन्याकुमारीचा समुद्र आणि आभाळ!

Related image

एक दिवस मी भारताच्या अगदी अगदी टोकावर उभा होतो. जणू सारा देश माझ्यात सामावत होता. मी त्याला माझ्यात आत आत घेत होतो. एक नाही, दोन नाही, तीन तीन समुद्रांचं निळं पाणी माझ्या पायाखाली नाचत होतं आणि वरती निळंभोर आभाळ. मी, समुद्र आणि आभाळ. ही जादूई निळाई. हे निळेभोरं क्षण. हेच पकडायला मी कुठून कुठून कसा कसा आलो होतो इथं. ही कन्याकुमारी. ही कन्नीकुमरी. हेच जुनं केप कॉमोरिन!
मिरज. बेळगाव. लोंढा. शिवथान. नागरगाळी. हुबळी. करत करत इरोड जंक्शनला पहाट झाली. तिथून परत झुक झुक झुक झुक. दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस सांगलीतून 30 तासाचा प्रवास करत सकाळी तिरुनेलवेली जंक्शनवर येऊन थांबली. भारतरत्न के. के. कामराज यांचा पुतळा जंक्शनबाहेर उभा होता. समोर मार्केट. नंतर ट्रॅव्हल्स पकडून कन्याकुमारी रोड. विटांची, कौलांची घरं. लहान लहान गावं. हिरवेगार डोंगर. वीट भट्ट्या आणि डोंगराच्या छाताडावर पाती फिरवत उभारलेल्या शेकडो पवनचक्क्या. लांबच्या लांब जाणार्या हायवेनं मी कन्याकुमारी सिटीत आलो तेव्हा एकदम मस्त वाटलं. जेव्हा कन्याकुमारीच्या काठावर समुद्र बघत होतो तेव्हा संध्याकाळ झाली होती. पाऊस पडत होता. पावसात समुद्र बघणं भारी रोमांचक असतं. आतनं बाहेरनं भिजून जातो आपण. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमाचं कवतीक सांगत आयुष्य गेलेल्या माझ्यासारख्या सांगलीकरासमोर आज तीन तीन समुद्रांचा संगम होता. बंगालचा उपसागर, हिंद महासागर आणि अरबी समुद्र. सांगलीतून केरळला निघालो होतो तेव्हा ओखी वादळ पुढं पुढं आणि मी मागं मागं असा पाठलाग होत होता. असल्या वादळात तिकडं मरायला जायचं कशाला असं ऐकून घेत मी अखेर कन्याकुमारीच्या या तटावर उभा होतो. आठ डिसेंबरलाही वादळाच्या खाणाखुणा वातावरणात जाणवत होत्या. श्रीलंकेला जबर तडाखा बसला होता. केरळ, तमीळनाडूला सावधानतेचे इशार्‍यावर इशारे दिले जात होते. मच्छीमार गायब झाल्याच्या बातम्या येत होत्या. तमीळ येत नसतानाही सारे पेपर घेतले मी. त्यातून समजत गेलं सारं. तसा कन्याकुमारीच्या तटाला ओखीचा जास्त फटका बसला नाही. मुंबईतून कन्याकुमारीत येऊन भर पावसात आईस्क्रिम विकत उभा राहिलेल्या अरजितनं तसं सांगितलं. मराठीत बोलणारा माणूस भेटल्याच्या आनंदात भर पावसात मी तीन आईस्क्रीम हाणली. काठानं चालत निघालो.
गरम पाण्यात उकडणारी बिनचवीची मक्याची कणसं कांदा-टोमॅटो-गरम मसाला टाकून उकडलेले ओले शेंगदाणे तिखट गरम मसाला चाट पुरी सारं गोड लागलं पावसात. कॅमेरा गळ्यात अडकवून दहा मिनिटात फोटो हातात ठेवणारे कॅमेरामन. सोवळी, लुंग्या, टॉवेल, सदरे विकत सायकलवरुन फिरणारी माणसं. काळ्या लुंगी नेसून या देवळातून त्या देवळात फिरणारी भक्त मंडळी. बरीच सेल्फी घ्यायलाच जन्माला आलेली. खेटून लाडानं चालणारी. समुद्राचं पाणी हातात घेत तासन् तास मंत्र म्हणत उभा राहिलेली. हजार रंगाची-हजार भागातली माणसं आणि त्यांची सरबराई करण्यात गुंतलेली स्थानिक माणसं. कन्याकुमारी भगवती मंदिराच्या आवारात माणसं शंख-शिंपली विकत बसली होती. हजार आकाराचे, रंगांचे नक्षीदार शंख. नाजूक आकाराची शिंपली. लाटा खाऊन खाऊन गुळगुळीत झालेली इवली इवली समुद्र दगडं सारा खजिना लुटावा वाटत होतं. दगड आणि शिंपल्यांच्या प्रेमात पडलो मी.
केरळ म्हणजे देवभूमी. देवांची भूमी. मंदिरांचं राज्य. एकसे एक देखणी, कोरीव, नक्षीदार, सुबक, दगड-लाकूड आणि सोन्यानं मढवलेली-घडवलेली ही मंदिरं वास्तुकलेतील पुरातन चमत्कारांची साक्ष देत उभी आहेत. हे सारं कसं, कधी, कुणी उभं केलं असेल त्याला सलाम. त्यामानानं तमीळनाडू नाही. केरळला समुद्रकिनारा लाभला आहे. जंगल आहे. निसर्ग आहे. पाण्याची छोटी छोटी बेटं, विमानतळं, जंक्शन्स, राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, असंख्य पर्यटन स्थळं यानं केरळ समृध्द आहेच. पण, महत्त्वाचं ते हे की त्याला शांतता आणि समृध्दीचा वारसाही आहे. शंभर टक्के साक्षरता असलेल्या या राज्यात व्यसनाधिनतेचं, अनारोग्याचं, कचरा-गटारींचं, रोगराईचं, बेकारीचं, दारिद्र्याचं, गुन्हेगारीचं प्रमाण किरकोळ आहे. केंद्राच्या राजकारणात केरळचं स्वतंत्र आस्तित्व आहे. वचक आहे. वेगळंपण आहे. ते केरळनं जपलं आहे. ते जपलेलं पावलापावलाला परक्याला जाणवावं इतकी निसर्गाशी एकरुपता केरळवासीयांनी जपली आहे. ही किमया केरळच्या सीमांना लागून असलेल्या कर्नाटक आणि तमीळनाडूला तितकी जमली नाही.
पोवर गाव केरळ आणि तमीळनाडूच्या वेशीवरचं गाव. कन्याकुमारी तमिळनाडूचं आणि देशाचंही शेवटचं टोक. कन्याकुमारी मंदिरापासून खरं तर मंदिरदर्शनांचा शुभारंभ झाला. कन्याकुमारीलाही रोमांचक पौराणिक कथा आहे. दगडांनी उभं केलेलं सुंदर मंदिर. आत दगडी मूर्ती. तुपाचे दिवे. (केरळ आणि तमिळनाडू दोन्ही राज्यात एकाही मंदिरात लाईट दिसली नाही. फक्त तुपांच्या दिव्यांचा मंद उजेड. आणि दिवे तरी किती? लक्ष लक्ष. मंदिरांच्या भिंतीवरच तशी योजना करुन घेतलेली. लक्ष लक्ष दिवे. आत गाभार्या्तही दिवे. मंद उजेडात सोन्याची, दगडाची देव देवतांची मूर्ती बघताना मन शांत होतं हे मी अनेकदा अनुभवलं या दिवसात. राज्यभरातील कोणत्याही मंदिरात जाताना शर्ट बनियन काढूनच आणि सोवळं किंवा लुंगी नेसूनच जावं लागतं. तिथं तडजोड नाही. ती नाही म्हणूनच पावित्र्यही टिकून आहे. कपाळावर आडवा गंध लावलेली तमिळ माणसं विलक्षण सुंदर दिसतात. रुबाबदार दिसतात. पुजारी आपल्या हातावर केळीच्या पानात ठेवलेली फुलं, गंध ठेवतात तेव्हा हा भक्तीचा गारवा शांत करुन जातो.) कन्याकुमारीचं दर्शन घेतलं. दुसर्याह काठावर स्वामी विवेकानंदांचं स्मारक, तिरुवल्लुरांचा भव्य पुतळा खुणावत होता. पण रात्री झाली. समुद्राची गाज ऐकत-खारा वारा अंगावर घेत झोप लागली. (रात्री स्वप्नात भर समुद्रात अडकलेले मच्छीमार आले आणि मी सिंदबादसारखं त्यांना लाटातून बाहेर काढलं सुखरूप.)
सकाळी बोटींच्या भोंग्यांनी जाग आली. भराभर आवरलं. बाहेर पडलो. बोटीतून पलिकडं विवेकानंद स्मारक बघायला जायचं होतं म्हणून आलो तर किलोमीटरभर रांग होती. तिकीट होतं. बोटीत बसलो. बोट हेलकावत स्मारकाकडे निघाली. हेच ते स्मारक, जे मी लहान असताना कधी इतिहासाच्या पुस्तकात बघितलं होतं. आज याचि देही याचि डोळा बघत होतो. अखंड बेट, अखंड दगडावरचं हे स्मारक. 1892मध्ये स्वामी विवेकानंद या बेटावर ध्यानस्थ बसले होते. त्यानंतर मा. एकनाथ रानडे यांच्या प्रयत्नातून हे स्मारक साकारलं गेलं, त्याला आता 50 वर्षे होतील. स्थापती एस.के.आचार्य यांनी त्याचे डिझाईन केले. अंबासमुद्रम आणि त्रिवेंद्रम भागातून त्यासाठी साहित्य जमा केलं गेलं. शिल्प शास्त्रानुसार दगडांची निवड केली गेली. तमिळनाडू स्टेट पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटची मदत झाली. सबमरीन केबलद्वारे वीज पुरवठा तर वायरलेसद्वारे दूरध्वनी यंत्रणा उभी करण्यात आली. तत्कालीन राष्ट्रपती गिरी यांच्या हस्ते त्याचं उदघाटन झालं होतं. विवेकानंद स्मारक समिती आणि विवेकानंद केंद्रातून ही सारी माहिती मिळाली. या केंद्राच्या देशभरात 813 शाखा आहेत. शिक्षण, योगा, निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन, पुस्तक प्रकाशन, प्रदर्शन यासारखी महत्त्वाची कामे या केंद्राच्यावतीनं सातत्यानं सुरु आहेत. विवेकानंदांची पुस्तकंही इथं मिळतात. भव्य दिव्य तितकंच रेखीव असलेलं हे स्मारक..आत स्वामी विवेकानंदांचा अप्रतिम देखणा ब्रांझचा भव्य पुतळा आहे. तो एन. एल. सोनवडेकर यांनी साकारला आहे. सोबत याच सभामंडपात रामकृष्ण परमहंस आणि माँ शारदा देवी यांच्याही मूर्ती आहेत. बाजुला ध्यानमंडप आहे आणि समोर दगडी शिल्पातून साकारलेला श्रीपाद मंडप. (भर समुद्रात असलेल्या या स्मारक परिसराला रोज हजारो लोक भेट देतात, पण तरीही इथं प्यायचं पाणी काही कमी पडत नाही, याचं कारण एक लाख 40 हजार गॅलन क्षमतेच्या दोन मोठ्या बांधीव हौदांमध्ये साठवलेलं पावसाचं पाणी. शिवाय बाहेरुन आणून साठवलेलं पाणी.) याच स्मारकाच्या समोरच्या बेटावर उभा आहे तमीळ संतकवी तिरुवल्लूवर याचा तब्बल 133 फूट उंचीचा दगडी पुतळा. 1979 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते या कामाची पायाभरणी झाली खरी पण काम सुरु व्हायला 1990 साल उजाडलं. नऊ वर्षानंतर 1999मध्ये हा पुतळा उभा राहिला आणि एक जानेवारी 2000ला त्याचं उदघाटन झालं. अप्रतिम पुतळा. थक्क करून सोडणारा. पण, समुद्राची पाण्याची पातळी खाली गेली की बोट तिकडं जाऊ शकत नाही. एका कवीचं इतकं भव्य स्मारक उभारणारं तमिळनाडू राज्य. मला महाराष्ट्रातल्या मराठी कवींची आणि काहींच्या स्मारकांची तेव्हाही आठवण झाली.
असं असलं तरी, कन्याकुमारी मंदिर. स्वामी विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लुवर यांचा हा पुतळा म्हणजेच काही सारी कन्याकुमारी सिटी नाही. कन्याकुमारी जिल्ह्याचं ठिकाण आहे. याच सागर किनार्‍यावर महात्मा गांधी यांचं स्मारकही आहे. 12 फेब्रुवारी 1948 रोजी समुद्रात अस्थिविसर्जीत केल्यानंतर त्यांच्या काही अस्थि या स्मारकातही ठेवण्यात आल्या आहेत. गोलाकार असलेली ही इमारत जुनी पण आकर्षक आहे. तिथं स्मारकाची काळजी घेणारे कम माहिती देणारे जलालभाई भेटले. गांधीजींबद्दल भरभरुन बोलले. हे स्मारक दुर्लक्षित राहिलं आहे. उदासही वाटतं. या स्मारकाला लागून ओपन मार्केट आहे. गरीबांसाठीचं. हजार स्टॉल्स. कपड्यांचे-शंख शिंपल्यांच्या दागिन्यांचे, फळांचे-पदार्थांचे. गरीब उपाशी उघडीनागडी माणसं. काहीही खाऊन जगणारी. चार पाच रुपड्यांसाठी पर्यटकांच्या मागं लागणारी. कन्याकुमारीचं हे दुसरं जग.
त्याच्याच पलिकडं आहे भारतरत्न कामराज यांचं जिवनचरित्र दाखवणारं दालन. कामराज यांचे जीवन उलगडून दाखवणारे असंख्य फोटोग्राफ्स या दालनात असले तरी परराज्यातील किती जणांना कामराज यांची सखोल माहिती आहे याची शंकाच, पण ज्यांना ती आहे त्यांच्यासाठी हे स्थळ प्रेरणादायी आहे.
नंतर मग पुलावर फिरलो. कन्याकुमारीच्या मच्छीमार निवारा केंद्रापासून (ही जुन्या धाटणीची कौलारू इमारत तर अफलातून सुंदर आहे) सुरु झालेला हा पूल पुढं आत आत समुद्रात जातो आणि मध्येच संपतो. अक्राळविक्राळ दगडांनी तयार केलेला हा पूल बघितला की रामसेतूची आठवण येते. याच पुलावर मग नांदेडचे डॉ. कदम भेटले. या पुलावरून समोर विवेकानंद स्मारक जरा दूर दिसत असलं तरी, पाठीमागं कन्याकुमारी सिटीचं विहंगम दृष्य मात्र मन मोहून टाकतं. समुद्रातल्या बोटी, मासेमारांची लगबग, चर्चची भव्य इमारत. सारंच सुंदर, जिवंत.
संध्याकाळी मग कन्याकुमारी सिटीत राऊंड मारला. इडली-डोस्यांचे वास पोटाला ढुशा मारतात. हजार हॉटेल्स-लॉजेस-दुकाने. झगमगाट. पण स्वच्छ सारं. शांत. जुनी मंदिरं बघितली. फाटक बंद झालेली. आत मंद दिवे. बाजार बघितला. नारळ 60 रुपये किलोनं, द्राक्षे 140 रुपयांनी. केळीचे घड अडकवलेले. एव्हाना रात्री 10 वाजता तर कन्याकुमारी झोपी जाते. सकाळी उठलो. पुढच्या प्रवासाला तयार झालो. कन्याकुमारीच्या मुख्य चौकात आलो तर जोरदार आंदोलन सुरु होतं. जोरदार भाषणबाजी, जोरदार घोषणाबाजी. पोलिसांनी कडं केलं होतं. वातावरण तंग होतं. ओखी वादळात हरवलेले काही मच्छीमार अजूनही गायब होते. सापडत नव्हते. मच्छीमारांचा संताप वाढत चालला होता. वादळानंतरचं हे वादळं कधी थांबणार होतं माहिती नाही. हे वादळ बघत मी कन्याकुमारीला अलविदा केलं.


................
नंदू गुरव