Breaking News

म्हासुर्णे येथील चार वर्षीय चिमुरडीचा अपघातात मृत्यू


निमसोड / प्रतिनिधी : म्हासुर्णे (ता. खटाव) येथे यात्रेस आलेल्या लहान बालिकेस चारचाकी गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात तिचा मृत्यू झाला. मनस्वी भरत कोळी (वय 4) रा. पुसेसावळी (ता. खटाव) असे ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. 
 
म्हासूर्णे येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेच्या निमित्ताने मनोरंजनाचा कार्यक्रम श्रीराम विद्यालयाच्या पटांगणावर सुरु होता. तो पाहण्यासाठी पुसेसावळी येथील फिर्यादी सोमनाथ कोळी व त्यांची पुतणी मनस्वी आले होते. त्यावेळी मनस्वीने चुलत्यांना मला आईस्क्रिम खाण्याची मागणी केली. त्यामुळे ते श्रीराम विद्यालयाच्या गेटसमोर असणार्‍या आईस्क्रिम विक्रेत्याकडे जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणार्‍या चारचाकी गाडी नं. ए.पी. 02 ए.डब्ल्यु. 2256 या गाडीची धडक बसली. त्यात फिर्यादी सोमनाथ सुरेश कोळी यांना किरकोळ दुखापत झाली तर मनस्वी हिला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. घटनेची नोंद मायणी दुरक्षेत्रात झाली असून पुढील तपास पोलीस हवालदार एस. जी. हांगे करीत आहेत.