Breaking News

आघाडीकडून विधानसभेची उमेदवारी निश्चित:नागवडे


श्रीगोंदे/प्रतिनिधी: आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून श्रीगोंदे विधानसभेची उमेदवारी निश्चित मिळणार असल्याचे जि. प. महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी सूतोवाच केले. कुकडीचे चालू असलेल्या दुष्काळी आवर्तनाबाबत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी स.शि.ना. नागवडे कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे , रमेश गायकवाड, सरपंच चिंभळे, आप्पासाहेब मोहिते, सुप्रिया पवार, सुरेखा लकडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना नागवडे म्हणाल्या की आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नागवडे  परिवाराला विधानसभेची उमेदवारी निश्चित मिळणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार सांगतील त्या वेळेस राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासाही त्यांनी केला. तालुक्यात सध्या दुष्काळाचे संकट मोठे आहे या दुष्काळाशी दोन हात करताना राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात भीषण दुष्काळ असून दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसाचा दुष्काळ पाहणी दौरा करणार आहे. सहकार शिवाजीराव नारायणराव नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार असल्याचेही अनुराधा नागवडे यांनी यावेळी सांगितले.