Breaking News

पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या ठरल्या संकटमोचक!


सातारा / प्रतिनिधी : माण तालुक्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. यावर्षीतर टंचाईची मोठी तीव्रता वाढली आहे. पशुधन वाचविण्याचे पशुपालकांसमोर मोठे संकट उभे होते. चारा छावण्या सुरु झाल्याने या छावण्या संकटमोचक ठरल्या असल्याच्या भावना चारा छावणीतील पशुपालकांनी व्यक्त केल्या.

पिंगळी बुद्रुक या चारा छावणीत आज घडीला 533 जनावरे व बिजवडी, ता. माण येथील चारा छावणीत 602 जनावरे आहेत. या दोन्ही चारा छावणीतील जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी लसीकरण करुन टॅगिंग केलेले आहे. या चारा छावणीत शासनाच्या निकषानुसार जनावरांना चारा, पेंड, पाणी याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाते.

पिंगळी बुद्रुक येथे नव्याने चारा छावणी सुरु होत आहे. या छावणीमध्ये आज घडीला 533 जनावरे आहेत. या छावणीमध्ये येणार्‍या प्रत्येक जनावरांचे लसीकरणाबरोबर टॅगिंगही करण्यात येत आहे. छावणीतील जनावरांना चारा, पेंड व पाण्याबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी.एन. खरात यांनी सांगितले.

शासनाच्या निकषानुसार छावणीतील जनावरांना चारा, पेंड व पाणी देण्यात येते. चारा छावणीत येणार्‍या प्रत्येक जनावरांची आरोग्याचीही काळजी घेतील जात असून जनावरांचा संभाळ करणे बांधलकी समजून सर्व सोयी-सुविधा चारा छावणीत उपलब्ध करुन दिल्याचे छावणी चालक धर्मराज जगदाळे यांनी सांगितले.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून अत्यल्प पाऊस झाला आहे. प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही अशा परिस्थितीत मी माझी जनावरे घेऊन चारा छावणीत आले. चारा छावणीत सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या असून रोज जनावरांना चारा, पेंड, पाणी तसेच जनावरांच्या आरोग्यासाठी रोज पशुवैद्यकीय अधिकारी छावणतील जनावरांची तपासीणी करतात, असे पिंगळी बु ता.माण येथील अनिता बरकडे यांनी सांगितले. जाधववाडी ता. माण येथील अप्पासाहेब भांडवलकर सांगतात, गेल्या दोन-तीन वर्षांपासून आमच्या भागात पाऊसच झाला नाही. आमच्या जनावरांचे कसे होणार याची काळजी लागली होती.

जाधववाडी येथे चारा छावणी सुरु झाली. या चारा छावणीत मी माझी जनावरे घेऊन आलो. चारा छावणीत माझ्या जनावरांना जाग्यावर चारा, पेंड, पाणी मिळतंय. तोंडल, ता. माण येथील शंकुतला बळिप सांगतात. आमच्या भागात पाऊसच पडला नाही. पाऊस नसल्यामुळं जनावरांना चारा, पाणी नव्हतं. या चारा छावणीमुळे माझ्या जनावरांना चार्‍याबरोबर पाणीही मिळतंय. सातारा जिल्ह्यात 20 शासकीय चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून त्यामध्ये मोठी जनावरे 16 हजार 984 व लहान जनावरे 3 हजार 165 अशी एकूण 20 हजार 149 जनावरे दाखल आहेत.

मागील आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल यांनी चारा छावणी, टँकर फिडिंग पॉईंटची पाहणी करुन संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैठकीही घेतली होती.

या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी मागेल, त्या गावाला टँकर तसेच चारा छावण्याचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्याच्या सूचना करुन दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देवून प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याच्या सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या.