Breaking News

आधी जनतेला पाणी द्या, मग उत्सव साजरे करा : शरद पवार


म्हसवड / प्रतिनिधी : ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी 23 तारखेनंतर आनंदोत्सव साजरा करावा. आमची त्याला हरकत नाही. आधी दुष्काळी जनतेला पाणी द्या, मग उत्सव साजरे करा. त्यांनी कधी निवडणूक लढविली नाही. त्यांना जनतेच्या प्रश्र्नांची जाणीव कशी असणार, असा टोला ना. शरदचंद्रजी पवार यांनी म्हसवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत लगावला.

म्हसवड येथे बारामती ऍग्रो टेक तर्फे माण तालुक्यातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

या योजनेतून परिसरातील गावांसाठी मोफत पाणी वाटप करणार आहे. 50 टँकरची सोय करण्यात आली असून, या टँकरचा खर्च बारामती ऍग्रो टेक तर्फे करण्यात येणार आहे.

या टँकर योजनेचा शुभारंभ ना. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी या दुष्काळी दौर्‍यात रोहित पवार, लोकसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डा.संदिप पोळ, जि.प. सदस्या सोनाली पोळ, जि प सदस्या भारती पोळ, माजी सभापती वसंतराव जगताप, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, माजी जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे, युवा नेते युवराज सुर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, किशोर सोनवणे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. शरदचंद्र पवार म्हणाले, सध्या महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. मात्र, सध्याचे सरकार हे याबाबत गंभीरपणे दखल घेत नाही, उलट चाल ढकल करत आहे. सरकारला या प्रश्र्नांची जाण नाही. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्र्न मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. माणसाला पिण्यासाठी पाणी नाही. चारा छावण्यांची मागणी वाढत आहे. 85 चारा छावण्या ची मागणी आहे. माण तालुक्यात फक्त 30 छावण्याच मंजूर झाल्या आहेत. त्या अद्याप सुरु नाहीत. माण तालुक्यात 30 हजार 635 जनावरे आहेत. 1972 सालापेक्षा अधिक मोठा दुष्काळ आहे. 1972 च्या दुष्काळात पाणी होते, पण धान्य नव्हते. आता पाणीच नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

चारा छावणीतील जनावरांना शासन केवळ 90 रुपये देत आहे, मात्र प्रत्यक्षात 115 रुपये खर्च येत आहे. शासनाने हा वाढीव खर्च द्यावा. यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दुष्काळी भागातील जनतेला दिसाला देण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करणार आहे. असेही ते म्हणाले. पाणी प्रश्र्नाचे राजकारण न करता गट तट विसरुन एकत्रित लढा देऊन या संकटावर मात करायला हवी आहे, असे सांगून ते म्हणाले, बारामती ऍग्रो टेक यांच्यामार्फत दुष्काळी भागात मोफत पाणी वाटप करण्यात येणार आहे. रोहित पवार व त्यांचे सहकारी यासाठी प्रयत्न करीत आहेत.

दुष्काळी भागातील पिकांचे नुकसान झाले त्या शेतकर्‍यांना विमा योजनेतून भरपाई मिळाली नाही. सरकार ला याबाबत आपण जाब विचारणार आहोत ,असे ही ते म्हणाले. 

माण तालूक्यात आम्ही गेलो तेथे आम्हांला लोकांनी सांगितले, पाणी नाही, जे पाणी आहे .ते पिण्यासाठी योग्य नाही. तिसरा मुद्दा रोजगार हमीची कामे उपलब्ध नाहीत. माण तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामावर 262 मजूर आहेत ,तर खटाव तालुक्यात 512 मजूर काम करीत आहेत. माण तालुक्यातील जनतेला रोजगार मिळाला तर इथल्या मजूरांना रोजगार निर्मिती होईल व स्थलांतर होणार नाही. 

रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तरच इथला शेतकरी टिकणार आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्र्नांची जाण नसलेले हे सरकार आहे. पिके करपुन गेली आहेत. तरी सरकार उपाययोजना करत नाही. केवळ आश्र्वासन देऊन प्रश्र्न सुटत नसतात. त्यासाठी प्रत्यक्ष फिल्डवर काम करावे लागते. असे ही ते म्हणाले.