Breaking News

छावण्यांमधील जनावरांना ‘लाळ्या खुरकत’ची लागण सरकारी डॉक्टर नियुक्त करण्याची किसान सभेची मागणी


अहमदनगर/प्रतिनिधी
चारा छावण्यांमधील बर्‍याच जनावरांना गेल्या महिन्यापासून लाळ्या खुरकत रोगाची लागण होत आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारी डॉक्टर नियुक्त करावेत, लाळ्या खुरकत रोगाच्या खर्चापोटी शेतकर्‍यांना प्रती जनावर दोन हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
नगर तालुक्यातील छावण्यांमधील बर्‍याच जनावरांना गेल्या महिन्यापासून लाळ्या खुरकत रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. उत्पन्न नसल्याने शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली असून, तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने पशुधन वाचविण्यासाठी गावोगाव जनावरांच्या छावण्या सुरू करून शेतकर्‍यांना मोठा आधार दिला आहे. मात्र, नगर तालुक्यात छावण्यांमध्ये असणार्‍या बर्‍याच जनावरांना लाळ्या खुरकत या रोगाची लागण झाली आहे. या जनावरांवर सरकारी उपचार होत नसल्याने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यास पशुधन वाचविण्यासाठी खासगी औषधोपचार करावे लागत आहेत. त्यासाठी त्याला दोन ते तीन हजार रुपये खर्च येत आहे. तरी लाळ्या खुरकत रोगावर त्वरित नियंत्रण मिळविण्यासाठी छावण्यांसह गोठ्यातील जनावरांवर उपचार करण्यासाठी सरकारी डॉक्टर नियुक्त करून रोग नियंत्रण करावे, लाळ्या खुरकत रोगाच्या खर्चापोटी शेतकर्‍यास प्रती जनावर दोन हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे. या मागण्यांची त्वरित पूर्तता न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. तसे निवेदनही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. या वेळी किसान सभेचे तालुकाध्यक्ष विकास गेरंगे, भाकपचे भैरवनाथ वाकळे, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे रामदास वागस्कर, ऑल इंडिया युथ फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष दीपक शिरसाठ, दत्ता देशमुख, तुषार सोनवणे, ज्ञानेश्‍वर लघाणे उपस्थित होते.