Breaking News

आंतरजातीय प्रेमाला होणार्‍या विरोधातून तरुणीची उच्च न्यायालयात धाव


कोळकी / प्रतिनिधी : आंतरजातीय प्रेमाला होणार्‍या विरोधातून पुणे जिल्ह्यातल्या एका तरुणीनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानं या मुलीच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसंच पीडित मुलीनं पोलिसात तक्रार दाखल करावी असंही न्यायलयानं सुचवलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी 21 मे रोजी होणार आहे .

या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की पीडित मुलीनं आधी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप त्या मुलीचे वकील नितीन सातपुते यांनी केला आहे. याबाबत पुढच्या सुनावणी च्यावेळी प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. उच्च न्यायालयात तिनं दाखल केलेल्या या याचिकेत म्हटल्याप्रमाणे ही 19 वर्षीय तरुणी मराठा समाजातली आहे आणि पुणे जिल्ह्यातल्या नवलाख उंबरे या गावची ती रहिवासी आहे. ती कायदा अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षात ती पुण्यात शिकते. कॉलेजमध्ये असतानाच तीन वर्षांपूर्वी ती मातंग समाजातल्या एका 19 वर्षीय तरुणाबरोबर प्रेमात पडली आणि त्या दोघांनीही कायद्याने विवाहाचं वय येताच लग्न करायचं ठरवलं. तीन महिन्यांपूर्वी तिच्या घरी या प्रेमप्रकरणाबद्दल कळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी प्रखर विरोध सुरू केला.त्या मुलीचा मोबाईल काढून घेतला गेला. तिचं कॉलेज जाणे बंद करण्यात आले. 

लग्नाचा प्रयत्न केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुलींने पालकांना समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला.पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट तिचं पूर्ण स्वातंत्‌रय हरवले गेले.पालकांना दूसर्‍या जातीतील मुलगा नको आहे. 

आंतरजातीय प्रेमविवाहाला विरोध करणार्‍या पालकांकडून जीवाला धोका आहे, म्हणून आपल्याला पूर्णवेळ पोलीस संरक्षण मिळावं, अशी मागणी तिने न्यायालयात केली आहे. ती तिच्या याचिकेत म्हणते की तिच्या घरून होणारा छळ एवढा वाढत गेला की 26 फेब्रुवारीला तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर ती काही काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होती. पण घरी परत आल्यावरही तिच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न थांबले नाहीत.
या याचिकेनुसार, 22 मार्चला व्यवसायानं वकील असलेल्या तिच्या काकांनी तिच्या डोक्याला एक गावठी पिस्तूल लावून तिला धमकावलं, की जर हे प्रेमसंबंध त्यांनी तात्काळ संपवले नाहीत तर तुझ्या मित्रालाही मारून टाकू. तिला मारहाणही केली. या सगळ्यातून बाहेर पडायची संधी मुलगी शोधत होती. तिने सांगितल्या प्रमाणे 27 फेब्रुवारीला घरच्यांबरोबर तिरुपतीला जात असताना ती पळून गेली. तेव्हापासून ती घरी परतलेली नाही.कायद्याने योग्य वय होताक्षणी लग्न करण्याचा त्यांचा दोघांचाही निर्णय आहे. तोपर्यंत कुटुंबीयांकडून असलेला धोका लक्षात घेता तिने पोलिसांकडे दाद मागितली, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचा तिचा दावा आहे. म्हणून तिने आता न्यायालयाकडे संरक्षण मागितल्याचं ती सांगते. 

या मुलीच्या कुटुंबीयांनी मात्र, ज्या घटना तिने याचिकेत कथन केल्या आहेत त्या घडल्याचं नाकारलं आहे.या मुलीच्यावतीनं विधिज्ञ नितीन सातपुते उच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. याप्रकरणी आता काय होणार याकडे ग्रामस्थांचे, तिच्या नातेवाईकांची आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.