Breaking News

नेवासे तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमणे हटवली


नेवासे/प्रतिनिधी: नेवासे येथील तहसील कार्यालयासमोरील अतिक्रमणे पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हटवण्यात आली. या अतिक्रमण धारकांचा प्रश्न या अगोदर सामंजस्याने मिटला होता . मात्र एका राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्याने येथे टपरी टाकल्याने सगळ्यांचीच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. परंतु सदरची अतिक्रमणे काढून तहसीलदार सुराणा यांच्याकडून तरुणांना बेरोजगार करण्याचा प्रयत्न झाला असल्याची टीका संजय सुखधान यांनी केली.

या प्रसंगी तहसीलदार रुपेश सुराणा, निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुनील नरसाळे आदी उपस्थित होते. यावेळी अतिक्रमणाबाबत अचानक केलेल्या या धडक कार्यवाहीमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने प्रशासनाने आमचे पुनर्वसन करावे अशी मागणी यावेळी अतिक्रमणधारक व्यावसायिकांनी केली.

..हा तर सुशिक्षितांना बेरोजगार करण्याचा धंदा

डिग्री प्राप्त करूनही नोकरी मिळेना म्हणून येथील युवकांनी झेरॉक्स मशीन, कॅम्पूटर जॉब वर्क सेंटर तहसील कचेरीच्या प्रांगणात सुरू केले होते. आम्ही अतिक्रमण काढण्याला विरोध करीत नाही मात्र या कारवाईमुळे सुशिक्षित युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. हा प्रयोग म्हणजे सुशिक्षित तरुणांना बेरोजगार करण्याचा धंदा आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखधान यांनी केले.