Breaking News

लिंबू विकणाऱ्याला सोशल मिडियावर हजारो लोकांची श्रध्दाजंली
अंगू जावळेचे निधन :  सायकलवरून भारदस्त आवाजात गाणी म्हणणाऱ्या अवलियाची एक्झिट  
कराड/(विशाल पाटील) – कराड शहरात आपल्या सायकलवरून लोकांना दहा रूपयांत दोन्ही होताची ओंजळ भरून लिंबू देणारा भारदस्त आवाजाच्या अवलियाचे शुक्रवारी निधन झाले. सायकलवरून साधा लिंबू विकणाऱ्या या अवलियाला सोशल मिडीयावर श्रध्दाजंली वाहण्यासाठी अक्षरशा हजारो लोकांनी धुमाकूळ घातला आहे. काही तासांतच हजारो लोकांनी सोशल मिडीयावर श्रध्दाजंली वाहीली आहे.
कराड शहरातील अंगू नवसे जावळे (वय ६५) असे या लिंबू विकणाऱ्या अवलियाचे नांव होते. वयाच्या ६५ वर्षापर्यंत बाजार समितीच्या समोर कचेरी आणि तेथून पंचायत समिती परिसर, कार्वे नाका, शिवाजी पुतळा, मलकापूर यासह मोक्याच्या ठिकाणी नेहमीच एक जाड बांध्यांचा शरिरयष्टीने जाडजूड माणूस, अंगात एक बंडी, डोक्याला भगवे रंगाचे टापर आणि बंडीला दोन खिसे असणारा एक अवलिया लोकांनी पाहिला आहे. नेहमी हा अवलिया आपली जुन्या काळातील सायकल घेवून त्याला दोन बाजूला दोन पोती लिंबूनी भरलेली घेवून येत असे. जेव्हा तो अवलिया लिंबू विकण्यास येत असे तेव्हा तो वेगवेगळी गाणी म्हणत असे, ती गाणी भारदस्त व मोठ्या आवाजात म्हणत असल्याने लोक त्यांच्याकडे आपसूक वळत असत. तेव्हा ही व्यक्ती लिंबू विकायला आली असे समजत असे. परंतु त्यापुढे लोक दहा रूपयांची नोट काढून लिंबू घेण्यास हात पुढे करत असत. मात्र लोकांच्या हातात ते लिंबू बसत नसत. कारण देणारा अवलिया हा हिशोब न करता केवळ देत होता. लिंबू देताना व्यावहारिकपणा पाहत नसल्याने लोक एवढे लिंबू दहा रूपयांत कसे आले, याचे आश्चर्य व्यक्त करत लिंबू घरी घेवून जात असत. मात्र घरापर्यंतच काय किंवा लिंबू संपेपर्यंत नव्हे तर जेव्हा लिंबू समोर दिसतील तेव्हा लोकांना हा आवलिया आठवणार हे नक्की. तसेच या अवलियाची गाणी आणि त्यांचा भारदस्त आवाज हा लोकांच्या लक्षात राहणार हेही खरे.
सोशल मिडियावर या आवलियाचे निधन झाल्याची बातमी पसरली. अनेकांना हा आवलिया कोठे राहतो, लिंबू तो कुठून विकायला आणत असे. तसेच त्यांची अन्य कोणतीही गोष्ट माहीती नसतानाही त्यांचे निधन झाल्याचे समजताच सोशल मिडियावर या आवलियाला व त्यांच्या दानशूरपणाला लाखो लोकांनी श्रध्दाजंली वाहिली आहे. कारण या अवलियाची एक्झिट अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. अंगू जावळे यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहीत मुलगी, चार मुले असा परिवार आहे.  
कष्टमय जीवन, मात्र चेहऱ्यावर नेहमीच हास्य
अंगू जावळे यांच्या जीवन मोठे हालाखीचे म्हणावे लागेल. कारण ते लिंबू विकण्याच्या आधी मार्केट कमिटीमध्ये हमालीचे काम करत होते. नंतर त्यांची चारही मुले येथे हमालीचे काम करतात. गेल्या १५ वर्षापासून अंगू जावळे यांनी हमाली सोडून लिंबू विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पहाटे ६ वाजता ते मार्केट कमिटीमध्ये जावून लिंबू घेवून शहरातील विविध भागात विकत असत. अशा या कष्टमय जीवन जगणाऱ्या मात्र चेहऱ्यांवर नेहमीच हास्य असणाऱ्या अवलियाचे बुधवारी (दि. १५) सकाळी १० वाजता एका दवाखान्यात निधन झाले.