Breaking News

काळ्या पैशाची माहिती देण्यास सरकारचा नकार


Image result for काळ्या पैशाची माहिती देण्यास सरकारचा नकार

नवीदिल्लीः स्वित्झर्लंडकडून काळ्या पैशासंदर्भात मिळालेली माहिती गोपनीय असून ती देता येणार नाही असे केंद्र सरकारने सांगितले आहे.
माहिती अधिकारात ही माहिती मागितली असता अर्थखात्याने उत्तर दिले आहे, की प्रत्येक प्रकरणातील काळ्या पैशासंदर्भातली माहिती भारत व स्वित्झर्लंड एकमेकांना देत असतात. जसा तपास होतो तशी माहिती एकमेकांना दिली जाते व ही सतत चालणारी प्रक्रिया आहे; परंतु स्वित्झर्लंडकडून मिळालेली काळ्या पैशासंदर्भातील  प्रकरणांची माहिती गोपनीय ठेवावी अशी तरतूद आहे. त्यामुळे ती माहितीच्या अधिकारात ही देता येणार नाही. स्वित्झर्लंडकडून काळ्या पैशासंदर्भातल्या प्रकरणांची, संबंधित व्यक्ती व कंपन्यांची व ही माहिती मिळाल्यावर काय कारवाई करण्यात आली याची माहिती माहितीच्या अधिकार कायद्यातून मागण्यात आली होती. भारत व स्वित्झर्लंड या दोन देशांमध्ये आर्थिक पारदर्शतेच्या दृष्टिकोनातून एक करार करण्यात आला असून एकमेकांच्या नागिरकांशी संबंधित असलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती दोन्ही देशांनी एकमेकांना द्यावी अशी तरतूद करण्यात आली आहे.

जानेवारी 2018 नंतर भारतीय नागरिकांनी स्वित्झर्लंडमध्ये ठेवलेल्या आर्थिक खात्यांची माहिती भारताला मिळण्याची यात तरतूद आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काळ्या पैशावरून भारतामध्ये प्रचंड प्रमाणात वादळ उठले होते. गेल्या निवडणुकीमध्ये तर प्रचाराचा मुद्दाही काळा पैसा हा होता; परंतु, काळा पैसा नक्की किती आहे व देशात किती आहे नी देशाबाहेर किती आहे याचा काही अंदाज नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

काळ्या पैशाबाबत अंधारातच

भारतीय नागरिकांनी कर चुकवून स्वित्झर्लंडमध्ये ठेवलेली बेनामी काळी संपत्ती उघड होईल, या आशेपोटी असा करार करण्यात आला होता; परंतु देशात तसेच देशाबाहेर नक्की किती काळा पैसा आहे याचा काही अंदाज नाही असे अर्थखात्यानं सांगितले आहे. या संदर्भात जे काही अंदाज व्यक्त करण्यात आले होते ते अधिकृत नसल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.