Breaking News

नरेंद्र मोदी दुर्योधन नव्हेत, जल्लाद!


पाटणाः लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर ताशेरे ओढत असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. यादरम्यान बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख (आरजेडी) लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना जल्लादशी केली आहे. राबडी देवी यांना पत्रकारांनी जेव्हा प्रियंका गांधी यांनी मोदी यांचा उल्लेख दुर्योधन असा केला आहे, असे सांगितले, तेव्हा त्यांनी म्हटले, की ‘प्रियंका गांधी यांनी दुर्योधन म्हणत चूक केली आहे, ते जल्लाद आहेत जल्लाद’.

राबडी देवी यांनी म्हटले आहे, की प्रियंका यांच्याकडून मोदी यांचा उल्लेख दुर्योधन करण्यात चूक झाली आहे. त्यांना दुसरी भाषा बोलायला हवी. ते सगळे जल्लाद आहेत. जे न्यायाधीशांची हत्या करतात, त्यांचे अपहरण करतात. अशा व्यक्तीचे विचार किती क्रूर असतील’. विशेष म्हणजे 2014 मध्ये लालूप्रसाद यादव यांनीदेखील मोदी यांना जल्लाद म्हटले होतं. मोदी कुठेही गेले, त्यांनी काहीही केले, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, की ते जल्लाद, जल्लाद आणि जल्लादच आहेत, या शब्दांत लालूप्रसाद यांनी टीका केली होती.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वधेरा मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली होती. देशाचे लक्ष विचलीत करण्याचे काम सध्या सुरू आहे. देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. इतिहास याची साक्ष देतो, दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता, असे प्रियंका यांनी म्हटले होते. प्रियंका गांधी यांच्या या टीकेवर शाह यांनी पश्‍चिम बंगालमधील बिशनपूर येथील सभेत प्रत्युत्तर दिले होते. 23 मे रोजी कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे समजणार, असे शाह यांनी म्हटले होते. काँग्रेस नेते मोदीजींविषयी अपशब्दांचा वापर करत असून तुम्ही मोदीजींचा अपमान सहन करणार का, असा सवालही शाह यांनी विचारला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही प्रियंका यांच्यावर टीका केली होती.