Breaking News

बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे यात्रेनिमित्त आलेली महिला बिबट्याच्या हल्यात जखमी झाली. ही घटना बुधवारी दि. ८ रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पेमगिरी-नांदुरी शिवारालगत घडली . सुदेशना रावसाहेब खैरनार (वय-४५) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

पेमगिरी येथील यात्रौत्सवाला सुदेशना खैरनार या मुलगा सूरज याच्याबरोबर दुचाकीवर येत होत्या. दरम्यान, पेमगिरी व नांदुरी शिवालगत डाळिंबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. यामध्ये सुदेशना खैरनार यांच्या डाव्या पायावर बिबट्याने जोराचा पंजा मारल्याने त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र धांदरफळ खुर्द येथे उपचारार्थ हलविण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडले. मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.