Breaking News

संगमनेरमध्ये नगरसेवकांच्या जागेसाठी पोटनिवडणूक


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर नगरपालिकेत गेल्या सहा महिन्यांपासून प्रभाग क्र.10 (अ) मध्ये रिक्त असलेल्या नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रियेला निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. दि.29 मी रोजी संबंधित वार्डाची मतदार यादी जाहीर केली जाणार असून पुढील महिन्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत आयोगाकडून मिळाले आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या रिक्त जागांवरील निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे.

राज्यात जवळपास 25 रिक्त पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. यात संगमनेर नगरपालिकेच्या प्रभाग 10 (अ) चा देखील समावेश आहे. यापूर्वी संगमनेर नगरपालिकेच्या 2016 साली झालेल्या प्रभाग क्र.10 (अ) वार्डात अटीतटीच्या निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार लखन घोरपडे यांनी विजय मिळविला होता. त्यांनी कॉग्रेसचे घनश्याम जेधे आणि अपक्ष अरुण वाकचौरे यांचा पराभव केला. त्यानंतर दोन्ही पराभूत उमेदवारांनी घोरपडे यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल संशय व्यक्त करत जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली होती. तसेच जात पडताळणी समितीकडेदेखील तक्रार करण्यात आली होती. नाशिक व नगरच्या जातपडताळणी समितीने यासंबधीची चौकशी करत जात प्रमाणपत्र रद्द ठरविले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना यासंबधीचा अहवाल मिळाल्यावर त्यांनी घोरपडे यांचे नगरसेवकपद रद्द केले.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार रिक्त झालेल्या पदांवर सहा महिन्यात निवडणूक घेणे अनिवार्य असल्याने यासंबधीच्या हालचाली सुरु झाल्या असून पुढील महिन्यात या रिक्त जागेसाठी निवडणूक होईल असे संकेत मिळाले. रिक्त जागेसाठी शिवसेनेसह कॉग्रेस कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान अवघ्या दोन वर्षांसाठी मिळणारी ही संधी हाती यावी यासाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गात मोडणार्‍या अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडून आपली वर्णी लागावी यासाठी पक्ष श्रेष्ठींच्या संपर्कात राहण्यास सुरवात केली आहे.