Breaking News

दुष्काळी पाहणी दौर्‍याच्या नावाखाली पालकमंत्र्याची ‘सहल’


सांगली : राज्यात दुष्काळ भयानक असून, पालकमंत्र्यानी दुष्काळी पाहणी दौरे सुरू केले असले, तरी त्यातून शेतकर्‍यांना म्हणावा तसा फायदा मिळतांना दिसून येत नाही. त्यामुळेच राज्यातील पालमंत्र्यांनी दुष्काळी पाहणी दौर्‍याच्या नावाखाली काढलेल्या सहली बंद कराव्यात. चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर तातडीने सुरू करावेत. अन्यथा एकाही मंत्र्याला सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पडळकर म्हणाले, आज जिल्ह्यातील तब्बल 467 गावांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, याठिकाणी योग्य नियोजन अद्याप प्रशासनाकडून करण्यात आले नसल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर असताना केवळ जिल्ह्यात अवघ्या 5 चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. तर शासनाच्या जाचक निकषांमुळे इतर ठिकाणी छावण्या सुरू करण्यास अडचणी येत असून ज्या छावण्या सुरू आहेत, त्याठिकाणी जनावरांना मुबलक चारा आणि खाद्यही मिळत नसल्याचा आरोप करत, छावणी संदर्भातील जाचक निकष बदलण्याची मागणी पडळकर यांनी यावेळी केली. तसेच अनेक गावात पिण्याची पाण्याची भीषण स्थिती असून 468 दुष्काळी गावांसाठी केवळ 506 टँकर खेपा मंजूर आहेत. यामुळे या 20 दिवसात एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे तातडीने पाण्याच्या खेपा वाढवण्याची गरज असून दुष्काळी जनतेला पाणी प्रशासनाकडून मिळाले पाहिजे,अशी मागणी यावेळी केली. तसेच सध्या सरकारच्या मंत्र्यांकडून केवळ जिल्ह्यात दुष्काळी पाहणी दौरे करून सहल साजरी करण्यात येत असल्याची टीका पडळकर यांनी सरकारवर केली. 

तसेच आधी दुष्काळाची पूर्तता करा अन्यथा एकही मंत्र्याला वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे. तर गाई,बैल,म्हशी या जानवरांच्या व्यतिरिक्त इतर जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर असुन यामध्ये प्रामुख्याने गाढव,घोडे,शेळ्या-मेंढ्या यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.पण सरकारकडून या जनावरांच्या चारयाबाबत सरकारने कोणताही विचार केला नसल्याने , याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 21 मे रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात येणार असल्याचाही इशारा वंचितचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. त्याचा बरोबर दुष्काळा बाबतीतही प्रत्येक तालुक्यात मोर्चे काढण्यात येणार असल्याचंही पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच दुष्काळी परिस्थिती बाबत जिल्हा प्रशासन सुस्तपणे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.