Breaking News

आजोबाच्या पराभवाचा नातवाने घेतला बदला; विखे, लोखंडे यांच्या विजयाने शरद पवार, थोरांतांना दणका


नगर / प्रतिनिधीः नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुजय विखे यांनी दणदणीत विजय मिळवत एकप्रकारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच रणसंग्रामात पराभूत केले आहे. आजोबा बाळासाहेब विखे यांच्या पराभवाचा बदला घेऊन सुजय यांनी एकप्रकारे आपल्याला आजोबांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या पराभवाने काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांना ही मोठा धक्का बसला आहे.

सुजय हे गेल्या दोन वर्षांपासून नगर लोकसभा मतदारसंघात तयारी करत होते. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे हे राज्याचे विरोधी पक्षनेते होते. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे; मात्र राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी विखे पिता-पुत्रांची मागणी होती. पवार यांनी मात्र त्यास नकार दिला. राष्ट्रवादीची या मतदारसंघात ताकद असून आम्हीच हा मतदारसंघ लढवू, अशी भूमिका त्यांनी घेतली. बाळासाहेब विखे यांना आम्ही या मतदारसंघात 1991 ला पराभूत केले आहे, असा दाखला पवार यांनी दिला. पवारांनी नकार दिल्याने विखे यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. विखे यांची ही उमेदवारी म्हणजे थेट शरद पवार यांनाच आव्हान होते. राष्ट्रवादीने विखे यांच्या विरोधात उमेदवार लवकर द्यायला हवा होता; मात्र राष्ट्रवादीने घोळ घातला. अनेक उमेदवारांची चाचपणी केली. निवडणुकीच्या 22 दिवस आधी ऐनवेळी संग्राम जगताप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. एवढ्या अल्पकाळात ते बांधणीच करू शकले नाहीत. प्रचार यंत्रणा राबविण्यातच राष्ट्रवादी कमी पडली.

विखे यांची बांधणी चांगली होती. स्वत: सुजय यांनी दोन वर्षांपूर्वीच एकप्रकारे आपली उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे त्यांचा बहुतांश प्रचार हा निवडणुकीपूर्वीच होऊन गेला होता. शिवाय या मतदारसंघात नाराजांची मनधरणी करण्यात ते यशस्वी झाले. चार आमदार, नगर महापालिकेची सत्ता आणि शिवसेना-भाजपची ताकद त्यांच्यामागे उभी राहिली. राष्ट्रवादीचे दोन आमदार असताना त्यांची ताकद मतांत परावर्तित झाली नाही. संग्राम यांचा मतदारसंघ असलेल्या नगर शहरात सुजय यांना 40 हजारांचे मताधिक्य मिळाले. वेगवेगळे समाजघटक भाजपवर नाराज असल्याने त्याचा फायदा संग्राम यांना होईल, असा अंदाज होता; परंतु तसे झाले नाही.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा एक आमदार, भाजपचे दोन आमदार आणि काँग्रेसचे तीन आमदार असताना ही सदाशिव लोखंडे यांनी दुसर्‍यांदा विजयश्री खेचून आणली. बाळासाहेब थोरात यांनी सर्व यंत्रणा कामाला लावूनही त्यांच्यावर मात करण्यात विखे यशस्वी झालेे. राधाकृष्ण विखे यांनी आपली सर्वंच ताकद लोखंडे यांच्या मागे लावली. विखे यांची ताकद मोठी असल्याचे या निवडणुकीत दिसून आले. सुजय यांची उपरोधिक प्रतिक्रिया पाहता विखे कुटुंबाची लढाई आता पवार आणि थोरात यांच्याशी यापुढेही सुरू राहील, असे संकेत मिळत आहेत.