Breaking News

संदीप कर्डिले यांचा संचालक पदाचा राजीनामा

राजीनामा साठी इमेज परिणाम

अहमदनगर/प्रतिनिधी : मागील काही महिन्यांपासून नगर बाजार समितीच्या सभापती बदलाच्या मागणीमुळे समितीच्या संचालक मंडळात अंतर्गत कलह सुरू आहेत. आ. शिवाजी कर्डिले यांचे पुतणे संदिप कर्डिले यांनी या कलहाला कंटाळून आज राजीनामा दिला. यामुळे बाजार समितीत सभापती बदलाचे राजकारण चांगलेच तापले आहे.
आक्टोबर 2016 मध्ये नगर बाजार समितीत आमदार कर्डिले, आमदार अरूण जगताप, माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या गटाची एकहाती सत्ता आली. त्यावेळपासून आमदार कर्डिले यांचे विश्‍वासू विलासराव शिंदे यांच्याकडे सभापतीपदाचा पदभार आहे. त्यानंतर एक वर्षभरातच शिंदे यांना सभापती पदावरून हटविण्यासाठी संचालक मंडळात गटबाजी सुरू झाली. मात्र आमदार कर्डिले यांच्यामुळे हि गटबाजी उफाळून आली नाही. अकरा महिन्यापुर्वीच आमदार कर्डिले यांचे पुतणे संदिप यांना स्विकृत संचालक म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाजार समितीच्या कारभारात जास्त वेळ देऊन लक्ष द्यायला सुरुवात केली. संदिप यांच्यामुळे सभापती शिंदे यांच्यावर नाराज असलेला गट पुन्हा सक्रिय झाला. संदिप कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सभापती बदलाचे राजकारण तापू लागले. त्यांच्याच नेतृत्वाखाली जवळपास 11 संचालकांनी लेखी मागणी करून सभापती बदलण्याची मागणी केली. काही संचालकांनी यास स्वाक्षरी न करता विरोध केल्याने संचालक मंडळात अंतर्गत कलह सुरू झाला. मागील आठवड्यात संचालक मंडळाची बैठक होती. त्यावेळी एका गटाने सभापती बदलण्याबाबत मोर्चबांधणी केली त्यात संदिप कर्डिले आघाडीवर होते. मात्र नेतेमंडळीनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संचालक मंडळातील अंतर्गत कलह वाढत गेला. आज संदिप कर्डिले यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा सभापती व सचिवांकडे दिला.