Breaking News

नियोजनाच्या अभावी सिद्धिविनायकाच्या प्रवेशद्वारातच बाजार


कर्जत/प्रतिनिधी: कर्जत तालुक्यातील सिद्धटेकला सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारातच फळे, पालेभाज्या विक्रेत्यांनी दुकाने मांडल्याने भाविकांची मंदिरापर्यंत जाण्यासाठी अडथळ्यांची शर्यत होत आहे. अतिक्रमणाने ग्रासलेल्या सिद्धटेकला मोकळा श्‍वास घेता येत नाही.नियोजनाच्या अभावामुळे फटका राज्यभरातून येणार्‍या भाविकांना बसत आहे. 

सिद्धटेकला गणेश भक्तांची नियमित रेलचेल असते. राज्यभरातून भाविकांचा ओघ असल्याने परिसरात भाविकांची गर्दी असते. मात्र, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातच अनेकांनी पालेभाज्या, फळे विक्रीला मांडल्याने भाविकांची कोंडी होत आहे. देवाच्या दारातच भाजेमंडई सुरु झाल्याने भक्तीभाव कमी आणि व्यावसायिकता जादा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक लोक खरेदीसाठी येत असल्याने येथे बाजाराचे रुप येत आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच सौंदर्यप्रसाधने, पुजेचे साहित्य आदी दुकानांची रांग लागते. तेथेच पुजेचे साहित्य, फुल, हार विक्रीसाठी गळ घालणारी मुले मंदिरापर्यंत येतात. विक्रेत्यांच्या भाऊगर्दीने भाविकांना नियंत्रित नजरेने मंदीरापर्यंत पोहोचावे लागते.

विकास व नियोजन समिती मंदीराच्या दारातील विक्रेत्यांसाठी काहीच नियोजन करीत नसल्याने त्याचा फटका भाविकांना बसत आहे. समितीला विकासावर खर्च करण्यासाठी लाखो रुपये खात्यात पडून असताना त्यावर निर्णय व अंमलबजावणी होत नाही. मंदीरानजीक व्यापारी संकुल बांधल्यास अतिक्रमणाचा प्रश्‍न सहज सुटू शकेल. मात्र, प्रशासनातील इच्छाशक्ती व नियोजनाच्या अभावामुळे अशी कामे होताना दिसत नाहीत. जिल्हाधिकारी व विकास समितीने याप्रश्‍नी लक्ष घातल्यास भाविकांना दर्शनासाठी अडथळ्यांची शर्यत करावी लागणार नाही.