Breaking News

मोदी निवडून आल्यास गाव सोडावे लागेल; मुस्लिमांची भावना; नयाबांसमध्ये मुस्लिमांवर हिंदूंचा बहिष्कार


लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या बुलंदशहरमधल्या नयाबांस गावातील मुस्लिमांना गाव सोडून जाण्याची भीती सतावते आहे. बुलंदशहरमधील या गावात राहणार्‍या मुस्लिमांच्या मते, गावात हिंदू-मुस्लिम एकमेकांशी बोलतदेखील नाहीत. पहिल्यांदा अशी परिस्थिती नव्हती. मुस्लिम मुलेही हिंदूंच्या मुलांशी खेळायची; परंतु आता मुस्लिम घाबरलेले असून, त्यांच्यामते दोन वर्षांत दोन्ही समाजांत मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण झाली आहे. गावातल्या मुस्लिम व्यक्तीने सांगितले, की जर भाजप पुन्हा जिंकला आणि मोदी पंतप्रधान झाले, तर दोन्ही समाजातील तणाव पराकोटीला जाऊ शकतो.

गावात छोटेसे दुकान असलेले गुलफाम अली म्हणाले, की पहिल्यांदा परिस्थिती चांगली होती. मुस्लिम-हिंदू सलोख्याने राहत होते. वाईट काळातही एकमेकांसोबत असायचे; पण मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी सर्वच परिस्थिती बिघडवून टाकली आहे. आम्हाला ही जागा सोडायची आहे; मात्र आम्ही असे करू शकत नाही. अली सांगतात, की जवळपास एक डझन मुस्लिम कुटुंबांनी गेल्या दोन वर्षांत गाव सोडले आहे. भाजपने या गावात अशी काही परिस्थिती नसल्याचे सांगितलं आहे. गेल्या वर्षी बुलंदशहरमधल्या याच भागात काही हिंदूंनी तक्रारी केल्या होत्या, की त्यांनी मुस्लिमांना गायीला कापताना पाहिले होतं. त्यानंतर जमावाने एका पोलिस अधिकार्‍यांचीही हत्या केली होती. चार हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नयाबांस गावात जवळपास 400 मुस्लिम राहतात; परंतु पाच महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसेच्या छायेतून गाव अद्याप बाहेर आलेले नाही.

भाजपचे प्रवक्ते गोपाल अग्रवाल म्हणाले, की त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे या घटनांना हिंदू-मुस्लिम वाद म्हणणे चुकीचे आहे. नयाबांस गावात इतिहासातही अनेक दंगली झाल्या आहेत. 1977मध्ये मशीद बनवण्याच्या प्रयत्नात दंगली उसळल्या होत्या. ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला होता; परंतु गाववाल्यांच्या मते गेल्या 40 वर्षांपासून इथली जनता सामंजस्याने राहते आहे. काही मुस्लिमांच्या मते, योगी सरकार आल्यानंतर कट्टर हिंदू अधिक आक्रमक झाले आहेत.