Breaking News

दंतेवाडा चकमकीत दोन नक्षलवादी ठार


दंतेवाडा : छत्तीसगडमधील दंतेवाडा मध्ये पुन्हा एकदा बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले आहेत. या चकमकीनंतर नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 

जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गुंडेरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली. अरणपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगल परिसरात बुधवारी पहाटे 5 वाजता सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली होती. नक्षलींच्या गोळीबारास जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी जवानांच्या गोळीबारात ठार झालेल्या एका महिला नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला . तसेच, घटनास्थळावरून एक रायफल,12 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा व अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला . या कारवाईत अन्य नक्षलवाद्यांचा देखील खात्मा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, त्यांचे मृतदेह हस्तगत झाले नसल्याची माहिती नक्षलवाद विरोधी मोहिमेचे पोलिस उपमहानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली आहे. सुरक्षा दलाचे सर्व जवान सुरक्षित आहेत. 

या कारवाईनंतर आसपासच्या परिसरातही जवानांची शोध मोहिम सुरूच आहे. दंतेवाडात कार्यरत असलेल्या डीआरजीच्या एकमेव महिलांच्या तुकडीत 30 आत्मसमर्पण केलेल्या नक्षली महिला व शरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या पत्नींचा समावेश करण्यात आलेला आहे. या कारवाईत जिल्हा रिझर्व्ह गार्ड महिला कमांडो ‘दंतेश्‍वरी’ने ही सहभाग घेतला होता. डीआरजीच्या या पथकामध्ये आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवादी आणि आत्मसमर्पण केलेल्या पुरुष नक्षलवाद्यांच्या पत्नींचा समावेश असतो. याच महिला कमांडो नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करतात.