Breaking News

छावणीचालकांकडून चारा छावण्या बंद करण्याचा इशारा


कोळगाव/प्रतिनिधी: राज्यातील छावणी चालकांना 'शौर्य ऍप' वापरण्याबाबत राज्यशासनाने सक्ती केली आहे. परंतु सर्व छावण्या ग्रामीण भागात आहेत. तेथे नेटवर्कची अडचण असल्याने छावणी चालकांना जनावरांचे दैनंदिन कामकाज शासनास सादरीकरण, तसेच अहवाल सादर करण्यास अडचणी येत असल्याने यातील अटी व शर्ती शिथिल करण्यात यावे अन्यथा १६ मे पासून श्रीगोंदे तालुक्यातील सर्व छावण्या बंद करण्यात येतील असा इशारा तालुक्यातील सर्व छावणी चालकांनी तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेनाद्वारे दिला.

तहसीलदार यांना छावणी चालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 'शौर्य ऍप' मध्ये छावणीत असलेल्या जनावरांचे दैनंदिन टॅग स्कॅन करणे, जनावरांचे 3 फोटो काढून अपलोड करणे, प्रत्येक जनावरांचे वजन करणे, काही जनावरे मारकी असल्याने शक्य होत नाही. तसेच जनावर मालकांकडे ऑनलाईन रेशनकार्ड नसल्याने त्यांचे रजिस्ट्रेशन करणे शक्य होत नाही. शासनाच्या नवीन नियमानुसार जर जनावरांना चारा वाटप १५ किलो व ७.५० किलो ऐवजी १८ व ९ किलो द्यायचा असेल तर छावण्याना अनुदानात वाढ करून १२० व ६० करून द्यावी. तसेच चारा छावणी सुरू होऊन ७० दिवस होउन गेले असून शासनाने छावणी मालकांना दिलेली ३० लाख रुपया पर्यंतची मर्यादा संपली असून ३० एप्रिल पर्यंतचे संपूर्ण अनुदान मिळावे. या अटी मान्य न झाल्यास १६ मे पासून सर्व छावण्या बंद करण्यात येतील व छावण्यात असल्याली जनावरे शासनाने सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी असा इशारा सर्व छावणी चालकांनी निवेदनाद्वारे दिला.