Breaking News

सावंतवाडीचे नगराध्यक्ष साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर?मुंबई / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले नसले, तरीही आता राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोकणात शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे जवळचे सहकारी बबन साळगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते.

शिवसेनेने राष्ट्रवादीत असलेल्या केसरकर यांनाही 2014 च्या निवडणुकीपूर्वी आपल्याकडे खेचले; पण आता याच केसकरांचे समर्थक साळगावकर हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. साळगावकर हे केसरकर यांच्या अत्यंत जवळचे सहकारी समजले जातात. ते सावंतवाडीचे तीन वेळा नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क असल्याचे बोलले जाते. दरम्यान, साळगावकर हे विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून इच्छुक असल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी दिली जाण्याचीही शक्यता आहे. असे झाल्यास या मतदारसंघात दोन मित्रच आगामी विधानसभा निवडणुकीत आमने-सामने उभा असल्याचे पाहायला मिळेल.